'त्या' व्यक्तीचा मृतदेह भारतात आणू - सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016


स्वराज रुग्णालयातूनही ऍक्‍टिव
सुषमा स्वराज या गेले महिनाभर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रकिया नुकतीच पार पडली असून, अशा स्थितीतही त्यांनी आपल्या या प्रकरणासाठी वेळ काढून संबंधितांच्या कुटुंबाला आश्वस्त केले.

नवी दिल्ली - जपानमध्ये हृदयक्रिया बंद पडून मृत्यू ओढावलेल्या गोपाळ राम यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहे. गोपाळ यांचा आठ दिवसांपूर्वी टोकियो शहरात मृत्यू झाला आहे.

गोपाळ यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती बेताची असून, ते त्यांचा मृतदेह भारतात आणू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी स्वराज यांना पत्र लिहून कल्पना दिली होती. त्याची स्वराज यांनी तातडीने दखल घेतली.'' आम्ही वेळ न दवडता हा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न करू, याचा सर्व खर्च सरकारच्या वतीने केला जाईल, असे ट्विट स्वराज यांनी केले आहे.

दिल्लीतील आंबेडकर नगरमध्ये राहणारे गोपाळ हे व्यवसायाने स्वयंपाकी (कुक) असून, ते गेल्यावर्षी जपानला गेले होते. एका हॉटेलमधून त्यांना कामावरून काढल्यानंतर ते काही स्थानिक दुकानांमध्ये काम करत होते. 10 डिसेंबरला त्यांच्या सहकाऱ्याने दूरध्वनी करून त्यांचे निधन झाल्याचे कळविले, अशी माहिती गोपाळ यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Web Title: Sushma Swaraj working from hospital; promises help in bringing body of Indian from Japan