स्वामी अग्निवेश यांना 'भाजयुमो'च्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

उज्ज्वलकुमार
बुधवार, 18 जुलै 2018

रांची : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी आज मारहाण केली. झारखंडातील पाकुड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत कार्यकर्त्यांनी 'अग्निवेश गो बॅक' अशा घोषणाही दिल्या. स्वामी अग्निवेश यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. 

रांची : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी आज मारहाण केली. झारखंडातील पाकुड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत कार्यकर्त्यांनी 'अग्निवेश गो बॅक' अशा घोषणाही दिल्या. स्वामी अग्निवेश यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. 

या घटनेच्या चौकशीचा आदेश मुख्यमंत्री रघुवर दास यांनी दिला आहे. गृह खात्याचे प्रधान सचिव ही चौकशी करतील, असे सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पाकुड जिल्ह्यातील लिट्टीपाडा येथे अखिल भारतीय आदिम जनजातीय विकास समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी स्वामी अग्निवेश आले होते. "मी कार्यक्रमस्थळी येताच भाजयुमो आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी हिंदूविरोधी बोलत असल्याचा त्यांचा आरोप होता,' असे स्वामी अग्निवेश यांनी सांगितले. 

माझ्या झारखंड दौऱ्याची कल्पना राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती. माझ्या सहकाऱ्यांनी तसे कळविले होते आणि त्याचा पुरावा आमच्याकडे आहे, असे स्वामी अग्निवेश यांनी सांगितले. मात्र, या दौऱ्याबाबत मला काहीच माहिती नव्हती, असे पोलिस अधीक्षक शैलेंद्रप्रसाद बुरुनवाल यांनी सांगितले. 

स्वामी अग्निवेश रांचीहून सकाळच्या रेल्वेगाडीने ते पाकुडला आले. तेथे मुस्कान नावाच्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. स्वामी अग्निवेश येताच, कार्यकर्त्यांनी समोरच्या रस्त्यावर जमून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यात आधी काळे झेंडे दाखविण्यात आले. नंतर स्वामी अग्निवेश यांना धक्काबुक्की झाली आणि नंतर लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यात आली. त्यांचा फेटा खेचण्यात आला. चपला आणि बुटांनी मारहाण केल्याचाही आरोप आहे. मारहाणीत स्वामी अग्निवेश यांच्या पायाला इजा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेत वाहिन्यांवर व्हायरल झाला. 

स्वामी अग्निवेश यांच्या दौऱ्याची प्रशासनाला माहिती नव्हती, असे बुरुनवाल यांनी सांगितले. मात्र, घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वामी अग्निवेश यांना मारहाण करणाऱ्यांची ओळख पटविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

झारखंड हे शांत राज्य असल्याचे मी ऐकले होते, पण या घटनेनंतर माझे मत बदलले आहे. - स्वामी अग्निवेश, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Swami Agnivesh assaulted by BJP youth