विस्तारानंतर आजच जाहीर होणार खातेवाटप

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 जुलै 2016

क्षणचित्रे - 

विस्तारात 10 राज्यांना प्रतिनिधीत्व
उत्तर प्रदेशाचे सर्वाधिक प्रत्येकी 3 मंत्री 

राज्याची एकूण मंत्री संख्या 16.
दलित व आदिवासी मंत्री 7 
अल्पसंख्यांक समाजाला 2 पदे

नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनाच्या एेतिहासिक दरबार हॉलमध्ये नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार आज (मंगळवार) सकाळी झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 40 मिनिटांच्या कार्यक्रमात मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कॅबीनेटपदी बढती मिळाली. 19 जणांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून रिपब्लिकन नेते रामदास आठवले व सुभाष भामरे यांना संधी देण्यात आली. सध्याच्या सरकारमधील 6 मंत्र्यांना नारळ दिला गेला आहे.
 

आज एस एस अहलुवालिया, अनिल माधव दवे, पुरूषोत्तम रूपाला, एम जे अकबर या ज्येष्ठ नेत्यांनाही राज्यमंत्रिमंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान, मनोज सिन्हा, पीयूष गोयल याची चर्चित बढती झाली नाही. एकूण 68 जणांच्या मंत्रिमंडळातून 6 वगळल्याने ही संख्या 62 झाली व नव्या 19 जणांसह टीम मोदीची संख्या 81 झाली असून निर्धारित संख्येपेक्षा केवळ 1 ने कमी आहे. जातीय समीकरणांबरोबरच धोरण आखणी व अभ्यास यात वाकबगार चेहऱयांना मोदींनी संधी दिली आहे. विस्तारानंतर लगेचच दुपारी 1 ला मोदी मंत्रिमंडळाची बैठक झाली. 
 

नवे मंत्री असे - प्रकाश जावडेकर (कॅबीनेटपदी बढती), राज्यमंत्री- एस एस अहलुवालिया, फग्गनसिंह कुलस्ते, एम जे अकबर, रमेश जिगजिनागी, विजय गोयल, रामदास आठवले, राजन गोहेन, अनिल माधव दवे, पुरूषोत्तम रूपाला, अर्जुन राम मेघवाळ, जसवंतसिंह बाभोर, डॉ. महेंद्रनाथ पांडे, अजय टामटा, अनुप्रियया पटेल, कृष्णा राज, पी पी चौधरी, मनसुख मंडाविया, पी पी चौधरी व सुभाष भामरे. यातील मेघवाळ, मंडाविया व दवे हे तिघे सायकलवरून संसदेत येण्यासाठी प्रसिद्ध  आहेत. आज आठवले चक्क स्वतःचेच नाव विसरले. राष्ट्रपतींनी त्यांना त्यांच्याच नावाची आठवण करून दिली. शपथ वाचतानाही ते वांवार अडखळत होते व राष्ट्रपती जवळपास प्रत्येक वाक्य वाचत होते. त्यांचे हे अडखळणे नंतर चांगलाच चर्चेचा विषय ठरले. 
 

खच्चून भरलेल्या दरबार हॉलमधील या शपथविधी समारंभाला नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा व संघटनमंत्री रामलाल, ज्येष्ठ मंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी, अरूण जेटली आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी व विदेशमंत्रि सुषमा स्वराज यांनी विविध कारणांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. भाजप संघटना (शहा) व सरकार (मोदी) यांतील ‘परफेक्ट‘ समन्वय यानिमित्ताने पुन्हा दिसून आला. आज वर्णी लागलेल्यांपैकी बहुतेक जणांनी काल शहा यांच्या निवासस्थानी पायधूळ झाडली होती. शिवसेना या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा होती. मात्र मंत्री अनंत गीते हे कार्यक्रमाला उपस्‍थित होते. 
 

दरम्यान मोदींनी 6 जणांची हकालपट्टी केली आहे. निहालचंद, सावरलाल जाट, मोहनभाई कुंदारिया, रामशंकर कठेरिया यांनी आज सकाळीच राजीनामे दिले. मात्र उत्तर प्रदेशाच्या पाश्‍र्वभूमीवर नजमा हेप्तुल्ला व कलराज मिश्रा या दोन वृध्दांची खुर्ची वाचल्याचे दिसत आहे. 

Web Title: Sworn-in ministers will be given charge of ministries today