'तलाक'मुळे मुस्लिम महिलेचे आयुष्य उध्वस्त : मोदी  

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

उत्तर प्रदेशने देशास अनेक पंतप्रधान दिले आहेत. उत्तर प्रदेशचा माझ्यावरही अधिकार आहेच. उत्तर प्रदेशने आत्तापर्यंत देशास दिलेल्या सर्व पंतप्रधानांच्या एकत्रित कामापेक्षा जात काम मला करुन दाखवायचे आहे

महोबा - देशातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील राजकीय वातावरण तापवयास आता सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज (सोमवार) राज्यातील महोबा येथे जनसभा घेतली. उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्याबरोबरच पंतप्रधानांनी त्यावेळी "तलाक'च्या संवेदनशील मुद्यासही स्पर्श केला.

महोबा येथील या सभेनंतर पंतप्रधान वाराणसी येथे दाखल होणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधानांकडून विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी झालेल्या या सभेमध्ये उत्तर प्रदेशची भूमी ही आपली माता असल्याचे भावनिक आवाहन करत पंतप्रधानांनी यापुढे या भूमीची लूट होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्‍त केला.

पंतप्रधान म्हणाले -

एखाद्या पुरुषाने फोनवरुनच तीनदा तलाक उच्चारुन मुस्लिम महिलेचे आयुष्य उध्वस्त करणे योग्य आहे काय? या विषयाचे राजकारण केले जाऊ नये. मात्र तरीही काही राजकीय पक्ष निव्वळ "व्होटबॅंके'च्या राजकारणासाठी मुस्लिम महिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून आश्‍चर्य वाटते

उत्तर प्रदेशने देशास अनेक पंतप्रधान दिले आहेत. उत्तर प्रदेशचा माझ्यावरही अधिकार आहेच. उत्तर प्रदेशने आत्तापर्यंत देशास दिलेल्या सर्व पंतप्रधानांच्या एकत्रित कामापेक्षा जात काम मला करुन दाखवायचे आहे

बुंदेलखंडमधील काही प्रकल्पांसाठी निधी पुरविण्यात आला आहे. परंतु अद्यापही येथे काहीही काम झालेले नाही, हे जाणून तुम्हाला दु:ख वाटेल. बुंदेलखंडमधील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. बुंदेलखंडच्या भूमीमधून सोने पिकू शकेल; मात्र शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. बुंदेलखंडची भूमी अत्यंत विशेष भूमी आहे. या भूमीने तलवारीच्या सहाय्याने पराक्रम गाजवला आहे; तर लेखणीच्या सहाय्याने रचनात्कता दर्शविली आहे

उत्तर प्रदेशची भूमी ही आमची माता आहे. आमच्या मातेची होत असलेली लूट यापुढे आम्ही सहन करणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांना केवळ त्यांच्या कुटूंबाची काळजी आहे; तर काही लोकांना निव्वळ सत्ता हवी आहे. भारतीय जनता पक्षास (भाजप) मात्र उत्तर प्रदेशचा विकास हवा आहे. येत्या निवडणुकीमधील चित्र अत्यंत स्पष्ट आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपला जनता पूर्ण बहुमत देईल

समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या सत्तास्पर्धेमध्ये उत्तर प्रदेशचा विकास भरडला जात आहे. दोन्ही पक्षांकडून आळीपाळीने लूट केली जाते; आणि सत्तेत आल्यानंतर कुठलाही पक्ष प्रतिस्पर्धी पक्षाविरोधात कसलीही कारवाई करत नाही

Web Title: Talaq ruins Muslim Woman's Life, says PM