उंदीर तोंडात धरून, अंगप्रदक्षिणा घालून शेतकऱ्यांची निदर्शने

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

अद्यापपर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणताही प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही, असे प्रेम यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : तमिळ शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता 23 दिवस पूर्ण झाले असून, अद्याप त्यांची मागण्यांची मोदी सरकारने दखल घेतलेली नाही. त्यामुळे जंतरमंतर येथे शेतकऱ्यांनी उंदीर तोंडात धरून, तसेच फक्त लंगोट नेसून जमिनीवर लोळण घेत अक्षरशः लोटांगणे घालून सरकारला विनवण्या करीत वेगळ्या पद्धतीने निदर्शने केली. 

देसिया तेनिंदिया नदीनीर इनाईप्पू व्यवसायगल संगम या शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी प्रेम कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्ही 150 शेतकरी जंतरमंतर येथे निदर्शने करीत आहोत. केंद्राची मदत मिळावी यासाठी जवळपास 40 शेतकऱ्यांनी लोटांगणं घेत 'अंगप्रदक्षिणा' घातल्या. आमच्या मागण्या केंद्राने मान्य कराव्यात अशी आमची इच्छा आहे. त्या मान्य करेपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू."

अद्यापपर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणताही प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही, असे प्रेम यांनी सांगितले. 
तमिळनाडूला दुष्काळग्रस्त राज्य म्हणून घोषित करावे, तसेच शेतकऱ्यांना त्वरीत मदत जाहीर करावी, आणि त्यांची कर्जे माफ करावीत अशा या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यापैकी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मद्रास उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे आम्हाला आनंद झाला आहे. परंतु, केंद्र सरकारकडून यावर तोडगा काढण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे प्रेम यांनी सांगितले. तसेच, केंद्र सरकारने देशातील नद्या जोडाव्यात अशीही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. 
 

Web Title: tamil farmers protest with biting mice, angapradarshanam