गोपनीय मतदानासाठी तामिळनाडू विधानसभेत गोंधळ

Palaniswami
Palaniswami

चेन्नई - बहुमत सिद्ध करताना गुप्त मतदानाची मागणी करत तमिळनाडू विधानसभेत आज (शनिवार) प्रचंड गोंधळ पहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या समोरच खुर्च्या व टेबलांची मोडतोड करण्यात आली. तर, ऑडियो स्पीकरचे कनेक्शनही तोडण्यात आले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी आमदारांना बहुमत चाचणीवेळी मतदान करण्यापूर्वी मतदारसंघात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसने गुप्त मतदानाची मागणी केली आहे. तर, द्रमुकने पलानस्वामी यांच्याविरोधात मतदान करणार असल्याचे म्हटले आहे.

तमिळनाडूतील सत्तास्पर्धेत आज (शनिवार) पलानीस्वामी यांना विधानसभेत बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेस सामोरे जात आहेत. या राजकीय साठमारीत कॉंग्रेसकडे आशेने पाहणाऱ्या शशिकला गटाला मोठा धक्का बसला. 'द्रमुक'प्रमाणे कॉंग्रेसनेही पलानीस्वामी यांच्याविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पनीरसेल्वम गटाने शशिकलांसह दिनाकरन आणि एस. व्यंकटेशन यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाची तत्त्वे आणि मूल्ये यांच्याविरोधात गेल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

पलानीस्वामी यांना विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी फार थोडा वेळ देण्यात आल्याने आमदारांच्या संभाव्य घोडेबाजाराची शक्‍यताही मावळल्याचे बोलले जाते. "अण्णा द्रमुक'ने आज शालेय शिक्षणमंत्री के. ए. सेंगोट्टियान यांची सभागृह नेतेपदी निवड केली. जयललिता या मुख्यमंत्री असताना हेच पद ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे होते. शशिकला यांच्या हकालपट्टीबाबत ई. मधुसूदन म्हणाले, "शशिकला यांनी जयललितांना राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. भविष्यामध्ये सरकार आणि पक्षाचा आपण घटक नसू, असेही त्यांनी म्हटले होते.'' काही दिवसांपूर्वी शशिकला यांनी मधुसूदन यांची पक्षाच्या राजकीय व्यवहारविषयक समितीवरून हकालपट्टी केली होती, त्यांच्या जागी आता सेंगोट्टियान यांना नेमण्यात आले आहे. 

अन्य पक्षांत खलबते 
राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर "द्रमुक'ने आज आपल्या 89 आमदारांची बैठक बोलावत पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. कॉंग्रेसच्या पाठीशीही आठ आमदारांचे बळ असल्याने या पक्षाची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरेल. पलानीस्वामी यांना आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी 117 आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे, पनीरसेल्वम यांच्या गटामध्ये आणखी सहा आमदार आल्यास पलानीस्वामींच्या अडचणी वाढू शकतात. 

शंभर टक्के उपस्थिती हवी 
पलानीस्वामी यांना आज बहुमताच्या परीक्षेस सामोरे जावे लागणार असल्याने पक्षाच्या सर्व आमदारांनी विधिमंडळामध्ये उपस्थित राहावे, असा पक्षादेश अण्णा द्रमुककडून जारी करण्यात आला होता. आपल्या गोटातील आमदार फुटू नयेत म्हणून पक्षाकडून त्यांना मंत्रिपदाचे आमिषही दाखविण्यात आले आहे. पनीरसेल्वम यांच्या गटाकडून आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

29 वर्षांनंतर परीक्षा 
तमिळनाडूत तब्बल 29 वर्षांनंतर एखादे सरकार बहुमत चाचणीला समोरे जात आहे. एम. जी. रामचंद्रन यांचे 1987 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी जानकी यांना 1988 मध्ये बहुमताच्या परीक्षेस सामोरे जावे लागले होते. तेव्हा मात्र बहुमत चाचणीतून कोणालाही स्पष्टपणे कौल मिळाला नव्हता. आता पुन्हा शशिकला यांचे निष्ठावंत पलानीस्वामी यांना या परीक्षेस सामोरे जावे लागत आहे. 

आयोगाने मागितले स्पष्टीकरण
"अण्णा द्रमुक'च्या हंगामी सरचिटणीसपदी झालेली शशिकला यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे. निवडणूक आयोगाने याबाबत शशिकलांकडून आज स्पष्टीकरण मागविले. काही दिवसांपूर्वी पनीरसेल्वम यांच्याच गटाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी झालेली निवड बेकायदा असल्याचे पनीरसेल्वम गटाचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com