तमिळनाडूत नोकरशहा धास्तावले 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

सध्या अण्णा द्रमुक पक्षात अस्वस्थता आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यासमवेत 33 वर्षे राहिले म्हणून मुख्यमंत्री होता येत नाही. शशिकला यांना मी भीत नाही. मी निवडणूक लढविण्यास तयार आहे. 
-दीपा जयकुमार 

चेन्नई-  तमिळनाडूत शशिकला मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरच नोकरशहांची "विकेट' पडू लागली आहे. अण्णा द्रमुकच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसंदर्भात देखरेख करणाऱ्या "ओएसडी' निवृत्त आयएसएस अधिकारी संथा शीला नायर यांनी राजीनामा दिला आहे. 

राज्याची सूत्रे शशिकला यांच्याकडे येणार असल्याच्या घडामोडींमुळे नोकरशहा धास्तावले आहेत. तसेच पोलिस खात्यातही अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे अनेक अधिकारी बदल्यांच्या मनःस्थितीत असून, ते कधीही सरकारी निवासस्थान सोडण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे गुप्तचर विभागाचे पोलिस महानिरीक्षक के. एन. सत्यमूर्ती हे शनिवारपासून ड्यूटीवरच आले नाहीत. आपण सुटीवर असल्याचे सत्यमूर्ती यांनी सांगितले. राज्य सरकारच्या सल्लागार शीला बालकृष्णन यांनी शुक्रवारी पद सोडले आहे आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचे सचिव राहिलेले के. एन. व्यंकटरमनन आणि ए. रामलिंगम यांनीही नोकरीला रामराम ठोकला आहे. राज्य नियोजन आयोगाच्या माजी उपाध्यक्ष संथा यांची माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांनी अण्णा द्रमुक सरकारच्या विशेष कार्यक्रम अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी नियुक्त केले होते. त्यांनी राजीनामा दिला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की तमिळनाडूत जयललिता यांचा तीनदा कार्यकाळ राहिला आणि यादरम्यान नोकरशहांमध्ये निकोप वातावरण होते. परंतु आता नेतृत्वबदलानंतर पुढे काय होईल, या भीतीने अधिकारी धास्तावले आहेत. 

जयललितांची भाचीचा शशिकलास विरोध 
जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी शशिकला यांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री करण्यास विरोध केला आहे. टी.नगर येथील निवासस्थानी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दीपा जयकुमार म्हणाल्या, की तमिळनाडूची जनता शशिकला यांना मुख्यमंत्री मानण्यास तयार नाहीत. शशिकला यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण अण्णा द्रमुक पक्षाला मत दिले नाही.

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शशिकला यांना पाहायची इच्छा नाही. आपण निवडणुका लढवणार असून, लवकरच नव्या पक्षाची घोषणा करू, असे स्पष्ट केले. जयललिता यांच्या मृत्यूबाबत त्या म्हणाल्या, की रुग्णालयाचा खुलासा पुरेसा नाही. डॉक्‍टरांनी अनेक प्रश्‍नांचे उत्तर आतापर्यंत दिलेले नाही. याअगोदर डॉक्‍टर खुलासा करण्यासाठी पुढे का आले नाहीत, असा प्रश्‍नही दीपा जयकुमार यांनी उपस्थित केला. सर्वकाही ठिक होते, तर मला रुग्णालयाच्या दारावर का अडवले. जयललिता या तणावात होत्या, एवढेच मला ठाऊक होते. 

 

Web Title: Tamil Nadu bureaucrats not happy