तमिळनाडूतील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

पी. अय्याकनू या आंदोलक शेतकऱ्याने सांगितले, की 25 मेपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू. तमिळनाडूला आज आम्ही परत जाण्यास तयार आहोत.

नवी दिल्ली - मागील 40 दिवसांपासून कर्जमाफीच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी 25 मेपर्यंत आपले आंदोलन स्थगित केले आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पी. अय्याकनू या आंदोलक शेतकऱ्याने सांगितले, की 25 मेपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू. तमिळनाडूला आज आम्ही परत जाण्यास तयार आहोत. कर्जमाफीच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी काही आंदोलक शेतकऱ्यांनी मूत्रप्राशन केले. सरकारने याचीही योग्य दखल न घेतल्यास मानवी मैला खाण्याची धमकी या शेतकऱ्यांनी दिली होती. अखेर आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

तमिळनाडूतील हे शेतकरी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले होते. कर्जमाफीच्या मागणीसाठी त्यांनी विविध मार्गाने आंदोलन केले. प्रथम त्यांनी मुंडण केले, नंतर उंदीर आणि सापही तोंडात धरले, सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला; पण सरकारने याची फारशी दखल न घेतल्याने अखेर त्यांना मूत्रप्राशन करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले होते. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, डाव्या पक्षांच्या काही नेत्यांसह सिनेसृष्टीतील ताऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला होता. गायक विशाल आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन केले आहे.

Web Title: Tamil Nadu farmers call off their strike, say they will resume it on May 25 if demands aren’t met