राज्यपालांकडून महिला पत्रकाराला संमतीविना स्पर्श

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

'पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला होता. मात्र, त्यांनी उत्तर देण्याऐवजी संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला.' 

- महिला पत्रकार

चेन्नई : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काल (मंगळवार) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान पुरोहित यांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला. या अनपेक्षित अशाप्रकारामुळे संबंधित महिला पत्रकाराने या घटनेबद्दल टि्वटरवर तीव्र संताप व्यक्त केला.  

banwarilal purohit

राज भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुरोहित बोलत होते. 'सेक्स फॉर डिग्री' प्रकरणामुळे तामिळनाडू राज्यात सध्या एकच खळबळ उडाली आहे. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यादरम्यान राज्यपाल पुरोहित यांनी पत्रकार महिलेला तिच्या संमतीविना स्पर्श केला. याबाबत त्या महिलेने सांगितले, की 'पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला होता. मात्र, त्यांनी उत्तर देण्याऐवजी संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला.' 

दरम्यान, द्रमुकच्या राज्यसभा खासदार कनिमोळी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ''एका घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या मर्यादा समजायल्या हव्या. त्यांनी महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला आहे. त्यांनी तिचा सन्मान राखलेला नाही.''

Web Title: Tamil nadu governor Banavarilal Purohit pats journalist on cheek sparks controversy