"एमजीआर' यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढावे

पीटीआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

अण्णा द्रमुकचे संस्थापक यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी होते. दानशूर, औदार्य, खंबीर नेतृत्व व राज्याच्या हक्कासाठी लढण्याची वृत्ती यासाठी तमिळनाडूच्या जनतेच्या ते कायम स्मरणात राहतील. अशा या क्रांतिकारी नेत्याच्या स्मरणार्थ नाणे व विशेष टपाल तिकीट काढून जन्मशताब्दी वर्षात त्यांचा सन्मान करणे योग्य ठरेल

चेन्नई - अण्णा द्रमुकचे संस्थापक व तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकीट व नाणे काढावे, अशी विनंती तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडे केली असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.

मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिले आहे. "अण्णा द्रमुकचे संस्थापक यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी होते. दानशूर, औदार्य, खंबीर नेतृत्व व राज्याच्या हक्कासाठी लढण्याची वृत्ती यासाठी तमिळनाडूच्या जनतेच्या ते कायम स्मरणात राहतील. अशा या क्रांतिकारी नेत्याच्या स्मरणार्थ नाणे व विशेष टपाल तिकीट काढून जन्मशताब्दी वर्षात त्यांचा सन्मान करणे योग्य ठरेल,' असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीस येत्या 17 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.

पनीरसेल्वम यांनी गुरुवारी (ता. 5) मोदी यांना पत्र लिहिले. ते आज राज्य सरकारने जाहीर केले. "एमजीआर' यांच्यावर टपाल तिकीट व नाणे काढल्यास तमिळनाडूतील सर्व थरातील लोकांकडून त्याचे स्वागत व कौतुक होईल. करण्यात येईल. यासंदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यवाही करण्याची सूचना राज्याचे मुख्य सचिव गिरिजा वैद्यनाथन यांना द्याव्यात, असे पनीरसेल्वम यांनी पत्रात म्हटले आहे. रामचंद्रन हे अत्यंत नावाजलेले, स्वतःचा करिश्‍मा असलेले व लोकप्रिय मुख्यमंत्री होते, असे गुणगान करीत पनीरसेल्व म्हणाले, की त्यांनी जनतेसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत. त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारत रत्न सन्मान देऊन गौरविले आहे, अशी आठवणही पत्रात करून देण्यात आली आहे.
 

Web Title: Tamil Nadu urges Centre to issue memorial coin, postal stamp on MGR