चेन्नईमध्ये "जल्लिकट्टु'साठी हजारो आंदोलक रस्त्यावर

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. आंदोलनाच्या प्रभावामुळे चेन्नई शहरामधील वाहतूक व्यवस्थेस फटका बसला आहे.

चेन्नई - तमिळनाडू राज्याची राजधानी असलेल्या चेन्नई शहरामध्ये आज (बुधवार) हजारो आंदोलकांनी जल्लिकट्टु खेळासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आंदोलनास प्रारंभ केला. आंदोलकांमध्ये विद्यार्थी व तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे.

तमिळनाडुमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या जल्लिकट्टु या बैलांच्या शर्यतीवर आधारलेल्या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. "पेटा' व इतर प्राणीवादी संघटनांनी जल्लिकट्टुस परवानगी दिली जाऊ नये, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यास मान्यता दर्शविल्याने तमिळनाडुमधील हजारो संतप्त आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

चेन्नईमधील प्रसिद्ध मरिना समुद्रकिनानाऱ्यावर काल (मंगळवार) रात्रीपासून हजारो आंदोलक जल्लिकट्टु व्हायलाच हवा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. या प्रकरणी ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसहित सरकारमधील दोन मंत्र्यांनीही आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणी राज्याची अधिकृत भूमिका स्पष्ट करणारे निवेदन द्यावे, या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.

आंदोलनाच्या प्रभावामुळे चेन्नई शहरामधील वाहतूक व्यवस्थेस फटका बसला आहे.

Web Title: Tamil Nadu witnessing mass agitation for jallikattu