टिकटॉकवर तृतीयपंथीयसोबत काढला व्हिडिओ अन...

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

सोशल मीडियामुळे आपला पळून गेलेला नवरा परत मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया जयाप्रदा यांनी दिली.

विल्लूपूरम (तमिळनाडू): टिकटॉकच्या माध्यमातून एकाने तृतीयपंथीयसोबत व्हिडिओ तयार केला अन्‌ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल झालेला व्हिडिओ एका महिलेपर्यंत पोहचला अन्‌ तीन वर्षांपूर्वी पळून गेलेला नवरा तिला परत मिळाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश याचे जयाप्रदासोबत विवाह झाला असून, त्यांना दोन मुलं आहेत. सुरेशने 2016 मध्ये कौटुंबिक समस्यांमुळे घरातून पळ काढला होता. जयाप्रदा यांनी पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. पण, सुरेशचा तपास काही लागत नव्हता. सुरेशने मेकॅनिक म्हणून काम सुरु केले होते. एका तृतीयपंथासोबत त्याने टिकटॉकवर व्हिडीओ तयार करून व्हायरल केला. काही आठवड्यांपुर्वी जयाप्रदा यांच्या एका नातेवाईकाला टिकटॉकवर सुरेशसारखा दिसणारी एक व्यक्ती दिसली. तिने जयाप्रदा यांना कळवलं असता हा आपला पतीच असल्याचे त्यांनी सांगितलं. जयाप्रदा यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी टिकटॉकच्या सहाय्याने सुरेशचा शोध लावला. शिवाय, तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या सहाय्याने सुरेशचा पत्ता मिळवला व त्याला ताब्यात घेतले. सुरेशला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियामुळे आपला पळून गेलेला नवरा परत मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया जयाप्रदा यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamil Nadu Woman Finds Missing Husband On TikTok Video After 3 Years