तमिळनाडूतील आंदोलक शेतकऱ्यांचे मूत्रप्राशन

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

सरकार दखल घेत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

नवी दिल्ली: मागील 39 दिवसांपासून कर्जमाफीच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तमिळनाडूतील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज अखेर फुटला. आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही आंदोलक शेतकऱ्यांनी मूत्रप्राशन केले. सरकारने याचीही योग्य दखल न घेतल्यास उद्या मानवी मैला खाण्याची धमकी या शेतकऱ्यांनी दिली आहे.

सरकार दखल घेत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

नवी दिल्ली: मागील 39 दिवसांपासून कर्जमाफीच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तमिळनाडूतील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज अखेर फुटला. आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही आंदोलक शेतकऱ्यांनी मूत्रप्राशन केले. सरकारने याचीही योग्य दखल न घेतल्यास उद्या मानवी मैला खाण्याची धमकी या शेतकऱ्यांनी दिली आहे.

तमिळनाडूतील हे शेतकरी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. कर्जमाफीच्या मागणीसाठी त्यांनी विविध मार्गाने आंदोलन केले. प्रथम त्यांनी मुंडण केले, नंतर उंदीर आणि सापही तोंडात धरले, सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला; पण सरकारने याची फारशी दखल न घेतल्याने अखेर त्यांना मूत्रप्राशन करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा प्रयत्नही निष्फळ ठरला. दरम्यान, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, डाव्या पक्षांच्या काही नेत्यांसह सिनेसृष्टीतील ताऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. गायक विशाल आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन केले आहे. केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्तांसाठी अर्थसाह्य आणि पिकांना चांगली आधारभूत किंमत अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. सरकार आम्हाला पाणी द्यायला तयार नाही, म्हणून आम्ही मूत्रप्राशन करत आहोत, असे पी. अय्याक्कानू या आंदोलक शेतकऱ्याने सांगितले.

राज्यात परत या : द्रमुक
तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन करण्याऐवजी राज्यात परत यावे आणि 25 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन द्रमुकचे कार्याध्यक्ष स्टॅलिन यांनी केले आहे. या आंदोलनात कॉंग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भाकप, "व्हीसीके', "एमएमके' आणि "आययुएमएल' हे पक्ष सहभागी होणार आहेत.

सोशल मीडियावर सरकार लक्ष्य
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले आहेत. अनेक नेटिझन्सनी केंद्र सरकारवर आगपाखड केली. आज दिवसभर ट्‌विटरवर #JaiKisan हा ट्रेंड पाहायला मिळाला. अनेकांनी फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन दिले. यामध्ये सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींचाही समावेश होता.

Web Title: tamilnadu farmers Urination