पंचतारांकित रिसॉर्टवर आमदारांची 'मज्जा'

पंचतारांकित रिसॉर्टवर आमदारांची 'मज्जा'

चेन्नई : तमिळनाडूतील राजकीय अस्थैर्यानंतर आता आपल्या गोटातील आमदार फुटू नयेत म्हणून अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांनी त्यांची रवानगी पंचतारांकित हॉटेल आणि रिसॉर्टवर केली आहे. शशिकला यांनी आपल्या 131 आमदारांचे विविध गटांमध्ये विभाजन करून त्यांची रवानगी वेगवेगळ्या रिसॉर्ट आणि हॉटेलांत केली असून, तेथे त्यांची शाही बडदास्त ठेवली जात आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आमदारांचा एक गट महाबलीपुरमजवळील "गोल्डन बे रिसॉर्ट'वर "मज्जा' करत असल्याचे आढळून आले. हे आमदार किनाऱ्यावरील भटकंती, जलक्रीडेसोबत मसाजचाही आनंद लुटत असल्याचे आढळून आले.


दुसरीकडे राज्य सरकारने साळसूदपणाचा आव आणत पक्षाचे सर्व आमदार त्यांच्या शासकीय निवासस्थानी असल्याचा दावा मद्रास उच्च न्यायालयामध्ये केला. या आमदारांना पक्षाने ताब्यात घेतलेले नसून, त्यांना कोठेही फिरण्याचा अधिकार असल्याचे राज्य सरकारने खंडपीठाला सांगितले.

अरविंद स्वामींची मोहीम
शशिकला यांनी अण्णा द्रमुकच्या आमदारांना अज्ञातस्थळी हलविल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये याच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दाक्षिणात्य अभिनेते अरविंद स्वामी यांनी आता या विरोधात "कॉल यूवर लॉमेकर' नावाची विशेष ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून लोकांना आपल्या आमदारांशी संपर्क साधत त्यांच्याकडे आपले मत नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व आमदारांचे क्रमांक व्हायरल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही मंडळींनी या क्रमांकांवर संपर्क साधला असता हे सर्व क्रमांक बंद असल्याचे आढळून आले आहे.

कोऱ्या कागदांवर घेतल्या सह्या
पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीअगोदरच कोऱ्या कागदावर आमच्या सह्या घेण्यात आल्या होत्या, पुढे याच बैठकीत शशिकला यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली, असा दावा अण्णा द्रमुकचे आमदार के. मणिक्कम यांनी केला आहे. आम्हाला या बैठकीची साधी पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती. पनीरसेल्वम यांच्या राजीनाम्यानंतरदेखील आम्हाला असाच धक्का बसला होता, असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या सर्व आमदारांचा आपल्यालाच पाठिंबा आहे, हे दाखविण्यासाठी शशिकला या कोऱ्या कागदांवरील सह्यांचा वापर करू शकतात, असेही बोलले जात आहे.

वेगळा पक्ष स्थापन करणार नाही : पनीरसेल्वम
आपण अण्णा द्रमुकचे प्रामाणिक कार्यकर्ते असल्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्‍न उद्‌भवतोच कोठे? भविष्यामध्ये नवा पक्ष स्थापन करण्याचादेखील आपला विचार नसल्याचे तमिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी एका इंग्रजी दैनिकास दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. अम्मांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्या 75 दिवसांच्या अवधीमध्ये मला एकदाही त्यांना भेटू दिले गेले नाही. आपण शेवटपर्यंत जयललिता यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत राहू, असेही त्यांनी नमूद केले.
 

शशिकलांवर पुन्हा टीका
शशिकला यांची 2011 मध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी एक विशेष पत्र लिहून अम्मांची माफी मागितल्यानंतरच त्यांना पक्षात घेण्यात आले होते, असा दावा पनीरसेल्वम यांनी आज केला. त्या वेळी शशिकला यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचाही ठपका ठेवण्यात आला होता, असा दावा पनीरसेल्वम यांनी केला. त्या वेळी शशिकलांनी अम्मांना लिहिलेले एक विशेष पत्रही त्यांनी आज सर्वांसमोर वाचून दाखविले. या पत्रामध्ये शशिकला यांनी आपल्याला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचा दावा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com