तमिळनाडूच्या शाळांत "वंदे मातरम्‌' अनिवार्य

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये देशाबद्दल स्वाभिमान असणे आवश्‍यक आहे. आपल्या मातृभूमीची आठवण भारतीय नागरिकांनी कायम ठेवावी. देशातील आजचे युवक हे उद्याचे भविष्य आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे देशभक्ती रुजण्यास मदत होईल आणि या महान राष्ट्राचे नागरिक म्हणून या आदेशाचा पालन प्रत्येक जण करेल, अशी आशा आहे.
न्या. मुरलीधरन, मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल

चेन्नई: तमिळनाडूतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये "वंदे मातरम्‌' हे राष्ट्रगीत आठवड्यातून एकदा तरी म्हणणे बंधनकारक असल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर केला.

के. वीरमणी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. तमिळनाडू शिक्षक भरती मंडळने 2013 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत एका गुण कमी पडल्याने वीरमणी यांची निवड झाली नव्हती. "वंदे मातरम' हे कोणत्या भाषेत आहे, याबद्दलच्या प्रश्‍नावर त्यांनी "बंगाली' असे उत्तर दिले होते; पण उत्तर संचानुसार "वंदे मातरम' हे संस्कृतमधून लिहिले आहे, असे उत्तर अपेक्षित होते. यावर आक्षेप नोंदवित वीरमणी यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत "वंदे मातरम्‌' संस्कृतमधून की बंगाली भाषेतून लिहिले आहे, याचे स्पष्टीकरण करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. त्यावर महाधिवक्ता आर. मुथुकुमारस्वामी यांनी "वंदे मातरम' हे गीत मूळ संस्कृतमधील असून, ते बंगाली भाषेत लिहिले असल्याचा निर्वाळा 13 जून रोजी दिला. त्यानंतर वीरमणी यांना भरती मंडळाने परीक्षेत एक गुण दिला.

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्ही. मुरलीधरन यांनी आज दिलेल्या निकालात म्हटले आहे की, राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत वंदे मातरम्‌ हे किमान आठवड्यातून एकदा तरी (प्राधान्याने सोमवार ते शुक्रवार) वाजविणे व गाणे बंधनकारक आहे. तसेच सरकारी कार्यालये व संस्था, खासगी कंपन्या व कारखाने, उद्योग येथे महिन्यातून एकदा "वंदे मातरम्‌' म्हटले गेले पाहिजे. यासाठी या राष्ट्रगीताचा तमीळ व इंग्रजी अनुवाद करण्याची सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला न्यायालयाने दिली आहे. सरकारी संकेतस्थळे व सोशल मीडियावरही ते उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.

Web Title: tamilnadu news Vande Mataram is mandatory in school