भाजप, संघाचे सदस्यच भारतीय आहेत का?- चिदंबरम

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

"आम्ही' कोण आहे, हे त्यांना विचारायचे आहे. ते केवळ भाजप आणि संघाच्या सदस्यांनाच भारतीय मानतात का?

नवी दिल्ली - भाजपचे नेते तरुण विजय यांच्या दक्षिण भारतीयांविषयीच्या वक्तव्याचा समाचार घेताना कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यच भारतीय आहेत का, अशी विचारणा आज केली. 

चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की आम्ही कृष्णवर्णीय लोकांबरोबर राहातो, असे तरुण विजय म्हणतात. यामध्ये "आम्ही' कोण आहे, हे त्यांना विचारायचे आहे. ते केवळ भाजप आणि संघाच्या सदस्यांनाच भारतीय मानतात का? चिदंबरम हे तमिळनाडूचे असून, माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच अर्थमंत्री आहेत. 

कृष्णवर्णीय असलेल्या दक्षिण भारतीय लोकांबरोबर राहात असल्यामुळे भारतीय लोकांना वर्णद्वेषी म्हटले जाऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य तरुण विजय यांनी शुक्रवारी केले होते. या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने हे वक्तव्य आश्‍चर्यकारक म्हटले असून, द्रमुकने हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

Web Title: tarun vijay think only bjp rss members are indians says chidambaram