बॅंकांमध्ये जमा झाले लक्षावधी कोटी रुपये...

पीटीआय
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नोटाबंदीनंतर 60 लाखपेक्षाही जास्त खात्यांमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरली गेल्याचे निदर्शनास आले आहे. या खात्यांमध्ये 7.34 लाख कोटींपेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आहे

नवी दिल्ली - सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर 500/1000 रुपये किंमतीच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी देण्यात आलेल्या 50 दिवसांच्या मुदतीमध्ये कर चुकवून जमविलेल्या धनापैकी सुमारे3-4 लाख कोटी रुपये बॅंकांमध्ये जमा करण्यात आल्याचे यासंदर्भातील परीक्षणामधून स्पष्ट झाले आहे.

प्राप्तिकर विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यास यासंदर्भात विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. कर चुकविला गेला असण्याची शक्‍यता असलेल्या देशभरातील खातेधारकांना नोटिसा बजाविण्याची मुख्य जबाबदारी या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे.

""आमच्याकडे आता प्रचंड माहिती उपलब्ध झाली आहे. या माहितीच्या विश्‍लेषणामधून नोटाबंदीनंतर 60 लाखपेक्षाही जास्त खात्यांमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरली गेल्याचे निदर्शनास आले आहे. या खात्यांमध्ये 7.34 लाख कोटींपेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आहे,'' असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

9 नोव्हेंबरपासून ईशान्य भारतामधील राज्यांमधील खात्यांमध्ये 10,700 कोटींपेक्षाही जास्त रक्कम भरली गेली आहे. सहकारी बॅंकांच्या विविध खात्यांमध्ये जमा झालेल्या 16 हजार कोटींपेक्षाही जास्त रकमेकडे प्राप्तिकर विभाग व सक्तवसुली संचलनालयाचे लक्ष असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. याशिवाय, नोटाबंदीच्या निर्णयानंतर तब्बल 80 हजार कोटींपेक्षाही जास्त रकमेचे कर्ज फेडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रादेशिक ग्रामीण बॅंकांमध्ये जमा झालेल्या 13 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचेही काटेकोर विश्‍लेषण करण्यात येत आहे.

Web Title: Tax evasion suspected in Rs 3-4 lakh crore deposited in Banks