तमिळनाडूतील मंत्र्यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

तमिळनाडूच्या दिवगंत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आर के नगर येथील जागेवर पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकांसाठी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप तमिनाडूचे मंत्री विजयभास्कर आणि अभिनेते शरदकुमार यांच्यावर करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज (शुक्रवार) सकाळी प्राप्तिकर विभागाने या दोघांच्याही निवासस्थानी छापे टाकले आहेत.

चेन्नई : तमिळनाडूच्या दिवगंत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आर के नगर येथील जागेवर पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकांसाठी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप तमिनाडूचे मंत्री विजयभास्कर आणि अभिनेते शरदकुमार यांच्यावर करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज (शुक्रवार) सकाळी प्राप्तिकर विभागाने या दोघांच्याही निवासस्थानी छापे टाकले आहेत.

येत्या 12 एप्रिल रोजी आर के नगर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. दरम्यान सोशल मिडियाद्वारे राज्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एआयडीएमकेच्या व्हीके शशिकला यांच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत एक व्यक्ती मतदारांना पैसे देत असल्याचे दिसत आहे. एका खोलीत एक व्यक्ती शशिकला यांच्या निवडणुक चिन्हावर मतदान करण्याचे सांगत इतर तीन व्यक्तींना प्रत्येकी दोन हजाराच्या दोन नोटा देताना 45 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे पैसे वाटण्यासाठी विजयभास्कर यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर प्राप्तिकर विभागाने आज विजयबास्कर यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या 34 ठिकाणच्या मालमत्तेवरही छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय अभिनेता शरदकुमार यांच्या निवासस्थानीही छापा टाकल्याचे वृत्त आहे.

Web Title: Tax Raids On Tamil Nadu Minister C Vijayabaskar, Actor Sarathkumar Ahead Of RK Nagar By-Polls