नितीश कुमारांनी राज्यातील आरोग्य आणि उद्योग क्षेत्र केले उद्ध्वस्त; तेजस्वींची घणाघाती टीका 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या मुद्यांवर घेरले आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आता राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या मुद्यांवर घेरले आहे. तेजस्वी यादव यांनी असा आरोप लावला आहे की, नितीश कुमार यांनी बिहारच्या आरोग्य क्षेत्राला आणि उद्योग-धंद्यांना देशोधडीला लावलं आहे. 

हेही वाचा - #Positive Story - मित्राला उपाशी पाहून सुरू केली टिफिन सर्व्हिस; महिन्याचा टर्नओव्हर 3 लाख

तेजस्वी यांनी आज शुक्रवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बेरोजगारी, स्थलांतर यांसारख्या मुद्यांवर बोलण्याचे आव्हान दिले. तेजस्वी यांनी यासंदर्भात हिंदीमध्ये एक ट्विट करुन नितीश कुमारांना आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटलंय की, सन्माननीय नितीशजींनी हे स्वीकारलं आहे की त्यांनी गेल्या 15 वर्षांच्या राज्यात शिक्षण, आरोग्य आणि उद्योग जगताला देशोधडीला लावलं आहे. त्यांनी वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांना बरबाद करुन टाकलं आहे. याच कारणांमुळे ते बेरोजगारी, उद्योग, गुंतवणुक आणि स्थलांतराच्या मुद्यांवर बोलत नाहीत. त्यांनी या मुद्यांवर बोलायला नको का?

तेजस्वी यांनी याआधी 27 ऑक्टोबरला एका रॅलीत म्हटलं होतं की, त्यांच्या कुंटुंबावर हल्ला करुन मुख्यमंत्री नितीश कुमार खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. ते केवळ त्यांच्यावर वैयक्तीक टीका करत आहेत. मात्र महागाई, भ्रष्टाचारसारख्या जनतेशी निगडीत मुद्यांवर ते काहीही बोलत नाहीयेत. तेजस्वी यांनी आरोप लावला की नितीश कुमारांनी त्यांच्या कुंटुंबावर हल्ला करुन महिलांच्या भावनांना दुखावलं आहे. मात्र वास्तवात त्यांनी खऱ्याखुऱ्या प्रश्नांना बगल दिली आहे. राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या नऊ मुलांवरुन नितीश कुमार यांनी केलेल्या टीकेवर तेजस्वी यादव यांनी हा पलटवरा केला होता. नितीश कुमार या दरम्यान जे काही बोलत आहेत ते आमच्यासाठी आशीर्वादासारखे आहे. ते एकप्रकारे नरेंद्र मोदींवरच निशाणा साधत आहेत, ज्यांचे स्वत:चे सहा भाऊ-बहिण आहेत. 

हेही वाचा - कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी बीसीजी लस परिणामकारक; ICMR चा दावा

तेजस्वी यांनी परत सांगितलं की ते केवळ महागाई, गरिबी आणि  बेरोजगारीसारख्याच मुद्यांवर आपले लक्ष केंद्रीत करतील. ते बिहारमध्ये फॅक्टरी आणि फूड प्रोसेसिंग युनिट सुरु करतील. बिहारच्या जनतेने राज्याशी निगडीत महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करुन राजदलाच मत देण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 55.69 टक्के मतदान झाले आहे, जे 2015 च्या तुलनेत अधिक आहे. कोविड-19 च्या अनेक नियमांच्या पार्श्वभूमीवरही मतदारांनी आपला उत्साह दाखवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tejashwi attacked nitish kumar ruined health & industry