नेत्यांची मुले 'सेट'; उत्तर प्रदेश 'अपसेट' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

बिहारमध्ये 2015च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वीसह आपल्या अन्य एका मुलाला उमेदवारी दिल्यानंतर मोदी यांनी त्यांना टोमणा मारला होता.

पाटणा - उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना उमेदवारी बहाल केल्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नेत्यांच्या मुलांना राजकारणात "सेट' करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान उत्तर प्रदेशला "अपसेट करीत आहे, अशी टीका त्यांनी ट्‌विटरवरून केली. 

केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांना नोएडामधून व अन्य नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचे भाजपने जाहीर केल्यानंतर तेजस्वी यांनी ट्विटरवरून मोदी यांना उद्देशून म्हटले आहे की, आदरणीय नरेंद्र मोदी जी, आता तुम्ही तुमच्या नेत्यांच्या मुलांना "सेट' करण्याच्या प्रयत्नात "यूपी' ला "अपसेट' करणार आहात का?' ट्‌विटच्या शेवटी "बिहारच्यासंदर्भात तुम्हाला काही आठवले का सर,'' असे म्हणून त्यांनी मोदी यांना चिमटा घेतला. 

बिहारमध्ये 2015च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वीसह आपल्या अन्य एका मुलाला उमेदवारी दिल्यानंतर मोदी यांनी त्यांना टोमणा मारला होता. याची आठवण तेजस्वी यांनी ट्विटवरून पंतप्रधानांना करून दिली. "2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुलीला निवडून आणण्यात लालूप्रसाद यांना अपयश आले. आता विधानसभा निवडणुकीत मुलांचे बस्तान राजकारणात बसविण्याची लालू यांची इच्छा असली, तरी यामुळे बिहारला याचा फटका बसेल, अशी टीका मोदी यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर केली होती. 

Web Title: Tejashwi Yadav attacks Narendra Modi over Rajnath Singh’s son candidature from Noida