
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांच्या अटकेबाबत मोठी अपडेट; आता सीबीआयला...
नवा दिल्ली - बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव २५ मार्च रोजी सीबीआयसमोर हजर होणार आहेत. यापूर्वी सीबीआयने त्यांना तीन वेळा चौकशीला हजार राहण्यासाठी समन्स बजावले होते, पण ते चौकशीसाठी आले नव्हते. दरम्यान, तेजस्वी यादव यांना अटक केली जाणार नाही, असे सीबीआयने कोर्टात सांगितले आहे.
सीबीआयने तेजस्वी यांना ४ आणि ११ मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते, पण ते हजर झाले नाहीत. त्यानंतर मंगळवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र तरीही ते हजर झाले नाहीत. या प्रकरणी सीबीआयने 4 मार्च रोजी राजद सुप्रीमो आणि तेजस्वी यांचे वडील लालू यादव यांची चौकशी केली होती.
एक दिवस आधी, 11 मार्च रोजी लालूंच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची केंद्रीय एजन्सीने त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी चौकशी केली होती.
सीबीआयने लालू यादव, राबडी देवी आणि इतर १४ जणांविरोधात गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी बुधवारी दिल्ली न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला. लँड फॉर जॉब घोटाळ्यात लालू यादव यांच्यावर आरोप आहे की त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री असताना रेल्वेत नोकरीच्या बदल्यात उमेदवारांकडून जमीन घेतली होती.