"मोदीजी, तुम्हाला 'ते' आश्‍वासन लक्षात आहे ना?"

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

'सरजी, कधी तुम्ही कोट्यवधी बेरोजगार तरुणांच्या दशेमुळे विचलित झाला आहेत का? दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे तुम्ही दिलेले आश्‍वासन तुमच्या लक्षात असेल अशी आशा आहे', असे म्हणत यादव यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

पाटना (बिहार) - देशातील बेरोजगार तरुणांबद्दल चिंता व्यक्त करत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोजगार देण्याबाबत दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करून दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्‌विटवर प्रतिक्रिया देताना तेजस्वी यादव यांनी मोदींवर टीका केली आहे. "खरे सांगू ज्यावेळी मला माहित झाले की 18 हजारपेक्षा अधिक गावांमध्ये वीज नाही, त्यावेळी मी खूप अस्वस्थ झालो. आम्ही वेगाने काम केले आणि उल्लेखनीय प्रगती केली आहे', असे ट्‌विट मोदी यांनी केले होते.

मोदींच्या या ट्‌विटवर यादव यांनी प्रतिक्रिया देताना "सरजी, कधी तुम्ही कोट्यवधी बेरोजगार तरुणांच्या दशेमुळे विचलित झाला आहेत का? दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे तुम्ही दिलेले आश्‍वासन तुमच्या लक्षात असेल अशी आशा आहे', असे म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.

तेजस्वी यादव यांच्यावर माती खरेदी गैरव्यवहार प्रकरणाचे आरोप होत आहेत. मात्र, हे सर्व आरोप फेटाळून लावत यादव यांनी माध्यमांवर टीका केली आहे.

Web Title: Tejaswi Yadav cirtcism on Narendra Modi twit