तेजस्वी यादव हे 'मोस्ट इलिजिबल बॅचलर' 

उज्ज्वल कुमार : सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

विवाहासाठी 40 हजार जणींनी मागणी घालणे ही काही सामान्य बाब नाही. तेजस्वी हे 'मोस्ट इलिजिबल बॅचलर' असल्यानेच त्यांना एवढ्या प्रचंड प्रमाणात प्रस्ताव आले आहेत.''

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री व लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना 44 हजार युवतींकडून लग्नाचे प्रस्ताव आल्याचे जाहीर झाले होते. त्यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. आता तर विरोधी पक्षांनीही त्यांचे कौतुक केले आहे. तेजस्वी हे 'मोस्ट इलिजिबल बॅचलर' असल्याचे कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह आणि भाजचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. 

दिग्विजयसिंह यांनी बुधवारी लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली, त्या वेळी तेजस्वी व तेजप्रताप यादव हेही उपस्थित होते. जातीयवादी शक्तींच्या विरोधात जो लढेल त्याला कॉंग्रेसचा पाठिंबा असेल, असे दिग्विजयसिंह यांनी सांगितले. लालू यांच्या भेटीनंतर ते हाजीपूरच्या स्थानिक न्यायालयात हजर झाले. 2012 मध्ये इंदूरमधील सभेत त्यांनी बाबा रामदेव यांच्यावर टीका केली होती, त्यावरून बाबांचे समर्थक अजितसिंह यांनी त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. 

दरम्यान, तेजस्वी यांना आलेल्या लग्नाच्या प्रस्तावांवर बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी 'तेजस्वी यांना विवाहासाठी स्वयंवराचेच आयोजन केले पाहिजे,' अशा शब्दांत फिरकी घेतली. बिहार चेंबर ऑफ कॉमर्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ''विवाहासाठी 40 हजार जणींनी मागणी घालणे ही काही सामान्य बाब नाही. तेजस्वी हे 'मोस्ट इलिजिबल बॅचलर' असल्यानेच त्यांना एवढ्या प्रचंड प्रमाणात प्रस्ताव आले आहेत.''

Web Title: Tejaswi Yadav is 'most eligible bachelor' in Bihar