तेजप्रताप, तेजस्वींवर भ्रष्टाचाराचे आरोप

उज्ज्वलकुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 एप्रिल 2017

सुशील मोदी ः यादव कुटुंबाकडे अवैध जमीन

पाटणा: बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे बंधू व आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहेत. हे दोघेही राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आहेत.

सुशील मोदी ः यादव कुटुंबाकडे अवैध जमीन

पाटणा: बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे बंधू व आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहेत. हे दोघेही राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आहेत.

लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांनी 750 कोटी रुपयांची अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी केला आहे. जनता दरबारात लोकांची गाऱ्हाणी ऐकल्यावर ते पत्रकारांबरोबर बोलत होते. ते म्हणाले की, लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना त्यांच्यासाठी बेनामी जमीन खरेदी करण्यासाठी एक बनावट कंपनी स्थापन करण्यात आली. ओमप्रकाश कत्याल कुटुंबीयांनी 2006 मध्ये "ए. के. इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन केली. ओमप्रकाश कत्याल यांनी 80 लाख, तर अमित कत्याल यांनी 35 लाख रुपयांचे कर्ज "ए. के. इन्फोसिस्टीम'ला दिले. तेजप्रताप आणि तेजस्वी यांना जमीन खरेदी करता यावी म्हणून हे कर्ज दिले गेले. 2014 मध्ये कत्याल कुटुंबीय या कंपनीतून बाहेर पडले आणि ही सगळी कंपनी लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांची झाली.

मोदी पुढे म्हणाले, की सध्या या कंपनीचे 85 टक्के शेअर्स राबडीदेवींकडे आणि 15 टक्के शेअर्स तेजस्वी यादव यांच्याकडे आहेत. रागिणी, लालूप्रसाद आणि चंदा यादव हे संचालक आहेत. कत्याल कुटुंबीयांचा बिहटमध्ये मद्याचा कारखाना आहे. लालूप्रसाद यांच्या मंत्रिपदाच्या काळातच त्यांनी ही कंपनी का स्थापन केली, या कंपनीने जमीन खरेदीव्यतिरिक्त दुसरा व्यवसाय का नाही केला, भूमिहीन असलेल्या प्रभूनाथ यादव यांनी आपले घर आणि जमीन तेजप्रताप यांना भेट कशी दिली, असे प्रश्‍न मोदींनी उपस्थित केले.

Web Title: Tejpratap, tejasvi on corruption charges