
Solapur : वाट MIM ची, वाटचाल केसीआर यांची
प्रकाश सनपूरकर
सोलापूर : लिंगायत, तेलुगू भाषिक, मुस्लिम, दलित असा महत्वाच्या समाजांची व्होट बँक असलेल्या सोलापूर शहराचे राजकीय मैदान अनेकांना सहजपणे खुणावते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत छुप्या पध्दतीने आणि २०१४ विधानसभा निवडणुकीत उघडपणे सोलापुरात एमआयएमची एन्ट्री झाली.
तेलंगणातील एमआयएम नांदेडमार्गे सोलापुरात आले आणि येथील राजकारणात स्थिरावले. एमआयएमची हीच वाट आता तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी धरल्याचे दिसत आहे. त्यांची नांदेड येथील सभा यशस्वी झाल्यानंतर त्यांना सोलापुरचे राजकीय मैदान खुणावू लागले आहे.
मुख्यमंत्री केसीआर यांचे जवळचे मित्र मल्लेशम बुरा यांनी सोलापूरचा दौरा करुन येथील राजकीय हाल-हवा जाणून घेतली आहे. मल्लेशम बुरा यांनी सोलापूरच्या दौऱ्यात येथील तेलुगु भाषिक असलेल्या महत्वाच्या राजकीय मंडळीशी गुप्तगू केल्याचे समजते.
त्यामध्ये माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचे नाव चर्चेत आहे. आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत माजी खासदार सादुल यांनी तुर्तास तरी दोन हात लांबच राहणे पसंत केल्याचे दिसत आहे. मल्लेशम बुरा यांनी आता पुढच्या सोलापू्र दौऱ्याची तयारी केल्याचे समजते. या सोलापूर दौऱ्यात ते तेलंगणातील पद्मशाली समाजाच्या आमदारांना घेऊन येणार असल्याची माहिती आहे.
सोलापूर शहराच्या राजकारणात सोलापूर शहर उत्तर व सोलापूर मध्य या दोन विधानसभा मतदार संघात तेलुगु भाषिकांची ताकद निर्णायक आहे. सोलापूर महापालिकेत तेलुगु भाषिकांचे २० ते २२ नगरसेवक विविध पक्षातून सहजपणे निवडून जातात. तेलुगु भाषिकांचा चेहरा म्हणून गेल्या काही वर्षांपासून माजी महापौर महेश कोठे यांच्याकडे पाहिले जाते.
तेलंगणाचा बीआरएस (भारत राष्ट्र समिती) सोलापूरच्या राजकारणात कोणाला हादरा देणार? याचे अंदाज बांधण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. बीआरएसच्या निशाण्यावर सध्या सोलापूर महापालिकेची निवडणूक असली बीआरएसचा खरा झटका हा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासूनच बसण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हा झटका काँग्रेसला बसतो की भाजपला, कोठेंना बसतो की आणखी कोणाला? यावर सोलापू्रचे राजकारण अवलंबून आहे. तेलंगणातील राजकारण मजबूत केल्यानंतर बीआरएसची वाटचाल राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने सुरू आहे. त्याचच एक भाग म्हणून मिशन महाराष्ट्र त्यांनी हाती घेतल्याचे दिसते. मिशन महाराष्ट्र करताना बीआरएसला सोलापूर शहर महत्वाचे आहे.
सोलापूरच्या राजकारणातील दुसऱ्या फळीतील कोणते मोहरे त्यांच्या हाताला लागतात? आणि सोलापूरसाठी बीआरएस किती ताकद पणाला लावते यावर बीआरएसी जडण-घडण अवलंबून आहे.
एमआयएम-बीआरएसचा अजेंडा एकच
मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणा राज्य निर्मितीनंतर विकासासोबत बिगर भाजप व बिगर कॉंग्रेसच्या राजकारणाची दिशा निश्चित केली. त्यादृष्ट्रीने त्यांनी राजकीय समिकरणे मांडली. एमआयएम देखील बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस या पध्दतीने राजकारण करत आहे. केसीआर यांनी तेलंगणामध्ये मुस्लीम समाजासाठी केलेल्या कामांचे दाखले दिले जात आहेत.
तेलुगु भाषिक आणि मुस्लिम अशा दुहेरी पातळीवर बीआरएस सोलापुरात उतरण्याची शक्यता आहे. बीआरएस आणि एमआयएम हे जरी दोन्ही वेगळे पक्ष असले तरीही अल्पसंख्यांक विकासाचा अजेंडा मात्र एकच आहे. एमआयएम आणि बीआरएसच्या माध्यमातून सोलापूरच्या राजकारणात दोन मोठ्या व्होट बँक एकत्रित येऊ शकतात.