एकट्या राहणाऱ्या महिलांना दरमहा हजार रुपये मिळणार

आर. एच. विद्या ः सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुख्यमंत्री राव यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपताच ही घोषणा केली. त्याचे आमदारांनी बाक वाजवून स्वागत केले. येत्या आर्थिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी मार्चमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्‍यक ती तरतूद करण्यात येईल

हैदराबाद - तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज आणखी एका मानवतावादी योजनेची घोषणा केली. त्यानुसार राज्यातील एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी सरकार आता दरमहा एक हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देणार आहे.

मुख्यमंत्री राव यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपताच ही घोषणा केली. त्याचे आमदारांनी बाक वाजवून स्वागत केले. येत्या आर्थिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी मार्चमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्‍यक ती तरतूद करण्यात येईल. प्राथमिक अंदाजानुसार राज्यात सध्या दोन ते तीन लाख महिला एकट्या राहतात.

राज्यात एकट्या राहणाऱ्या महिलांची यादी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या यादीत नावे समाविष्ट करावीत आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व महिलांना केले आहे. या योजनेचा लाभ नेमक्‍या लाभार्थींपर्यंत पोचविण्यासाठी आमदारांनी काळजी घ्यावी, असे राव यांनी सांगितले.

या वेळी राव म्हणाले, ""समाजातील सर्व घटकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विरोधक जाहीरनाम्यातील आश्‍वासने पूर्ण करण्याची मागणी करीत आहेत. मात्र सरकार त्याचबरोबर गरिबांचे प्रश्न सोडविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. जाहीरनाम्यात याचा उल्लेख नव्हता. या महिन्यातच सरकारने विडी कामगारांना दरमहा एक हजार रुपयांचा भत्ता देण्याचा त्यासाठीच निर्णय घेतला आहे.'' "कल्याणलक्ष्मी' आणि "शादी मुबारक' या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. या योजनेनुसार गरीब व अल्पसंख्य समाजातील मुलींच्या लग्नासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.

Web Title: Telangana to grant Rs 1,000 monthly wages to ‘lonely women’ prone to poverty