दूरसंचार टॉवरला मिळावा वीजपुरवठ्याचा विशेष दर्जा

पीटीआय
सोमवार, 27 मार्च 2017

दूरसंचार टॉवर कंपन्यांसमोर विजेची सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे देशभरात वीजपुरवठ्यासाठी टॉवरला विशेष दर्जा देऊन दूरसंचार क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवावी, अशी मागणी टॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोव्हायडर्स असोसिएशनने (टीएआयपीए) सरकारकडे रविवारी केली.

भुवनेश्‍वर - दूरसंचार टॉवर कंपन्यांसमोर विजेची सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे देशभरात वीजपुरवठ्यासाठी टॉवरला विशेष दर्जा देऊन दूरसंचार क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवावी, अशी मागणी टॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोव्हायडर्स असोसिएशनने (टीएआयपीए) सरकारकडे रविवारी केली.

"टीएआयपीए'चे अध्यक्ष अखिल गुप्ता म्हणाले, ""सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या वीज मंडळांना दूरसंचार क्षेत्र आणि टॉवरसाठी विशेष दर्जा देण्याची सूचना करावी. विजेची समस्या दूरसंचार क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. देशाच्या पूर्वेकडील भागात हे प्रकर्षाने जाणवते. पूर्वेकडील भागात दूरसंचार पायाभूत सुविधा निर्माण करण्यास टॉवरचालक सकारात्मक आहेत. मात्र, यासाठी विजेचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हायला हवा. ओडिशामध्ये वीजपुरवठा समाधानकारक असला, तरी काही राज्यांमध्ये टॉवरचालकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका बसत आहे.''

गुप्ता हे भारती समूहाचे उपाध्यक्ष आणि भारत इन्फ्राटेलचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, ""विभागातील नक्षलवादी चळवळीचाही मोठा त्रास टॉवरचालकांना आहे. आता राज्य सरकारांकडून उचलण्यात आलेल्या पावलांमुळे यात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. सध्या पूर्व भागात 77 हजार 855 टॉवर असून, एप्रिल 2018 पर्यंत त्यांची संख्या 2 लाखांपर्यंत नेण्याची गरज आहे.''

Web Title: Telecom tower must get electricity poll special status