विनयभंगप्रकरणी मंगेशी देवस्थान पुजारी धनंजय भावेची अटक अटळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पीडीत तरुणींनीही या अर्जाच्या सुनावणीवेळी सादर केलेल्या हस्तक्षेप अर्जांना खंडपीठाने परवानगी दिली होती व त्यांच्या वकिलांनीही संशयिताला अटकपूर्व जामीन न देण्याची विनंती केली होती.

पणजी - मंगेशी येथील देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन तरुणींवरील विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या देवस्थानचा पुजारी संशयित धनंजय भावे याचे दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्यायमूर्ती नुतन सरदेसाई यांनी फेटाळले. अर्जदाराने पोलिसांसमोर शरण जाण्याचे ठरविले असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी खंडपीठाला दिली मात्र उशीर झाल्याचे सांगून खंडपीठाने निर्णय दिला. 

गेल्या मंगळवारी (14 ऑगस्ट) संशयित धनंजय भावे याच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण होऊन खंडपीठाने त्याचा निकाला राखून ठेवला होता. पीडीत तरुणींनीही या अर्जाच्या सुनावणीवेळी सादर केलेल्या हस्तक्षेप अर्जांना खंडपीठाने परवानगी दिली होती व त्यांच्या वकिलांनीही संशयिताला अटकपूर्व जामीन न देण्याची विनंती केली होती. सरकारी वकील एस. रिवणकर यांनी या अटकपूर्व जामीन जोरदार विरोध करताना संशयिताने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याचे तसेच यापूर्वी आणखी अशाच घटना घडल्या आहेत का व लज्जास्पद कोणी तरुणी तक्रार दाखल करण्यात पुढे आल्या नाहीत का? याची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी आवश्‍यक असल्याचा युक्तिवाद केला होता.

Web Title: Temple pujari Dhananjay Bhave will be arrested in Molestation Matter