गोव्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना समजणार अंतर्गत गुण

अवित बगळे
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पणजी : गोव्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला अंतर्गत गुण किती मिळाले याची माहिती लगेच समजणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यालयात नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर हे गुण एसएमएसने कळवण्यात येणार आहेत.

पणजी : गोव्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला अंतर्गत गुण किती मिळाले याची माहिती लगेच समजणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यालयात नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर हे गुण एसएमएसने कळवण्यात येणार आहेत.

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळा प्रमुखांकडून विद्यार्थी वा पालक यांचे मोबाईल क्रमांक मागितले आहेत. मात्र काही मुख्याध्यापकांनी आपलाच मोबाईल क्रमांक मंडळाला कळवण्याचा पराक्रम केला आहे. मंडळ आपल्या कारभारात पारदर्शकता आणण्यास प्रयत्न करत असताना काही मुख्याध्यापकांची जुनाट मानसिकता त्याचा आड येत असल्याचे दिसून येते. अशा मुख्याध्यापकांनी पालक वा विद्यार्थी यांचे मोबाईल क्रमांक कळवावे असे मंडळाने पुन्हा कळवले आहे.
दहावीची विद्यार्थ्यांनी काही गुण हे विद्यालयातल्या त्यांच्या कामगिरीवर दिले जातात. त्यांना अंतर्गत गुण म्हटले जाते. शाळेतील विषय शिक्षकांकडून असे गुण दिले जातात.

आता सध्या दहावीची एक परीक्षा झाली आहे. त्या परीक्षेत विद्यार्थ्याला किती गुण मिळाले हे एसएमएसच्या माध्यमातून समजावे यासाठी मंडळाने ही व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला प्रत्यक्षात किती गुण पडले आणि शाळेतून त्याचे किती गुण मंडळाला कळवण्यात आले याची पालकांना खातरजमा करता येणार आहे. यासाठी पालक वा विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक मंडळाने मुख्याध्यापकांकडे मागितले होते. काही मुख्याध्यापकांनी आपलेच क्रमांक दिले. ते मंडळाच्या लक्षात आल्याने त्या मुख्याध्यापकांना पून्हा पत्र पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, मंडळाने यंदाच्या दहावी, बारावी परीक्षेसाठी कुजिरा या नव्या परीक्षा केंद्राची निर्मिती केली आहे. कुजिरा, बांबोळी आणि परिसरातील दहावी, बारावीचे विद्यार्थी कुजिरा शैक्षणिक संकुलातील या केंद्राचा वापर करू शकतील. यापूर्वी या शाळा पणजी केंद्राच्या अंतर्गत येत होत्या. पणजी व कुजिरा यांच्यातील अंतर लक्षात घेता एका केंद्र प्रमुखांना दोन्हीकडे काम करणे केवळ अशक्य होत होते. त्यामुळे नव्या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासातही मदत

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कशी लिहावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने आणखीन एक पाऊल उचलले आहे. मंडळाचे सदस्य सचिव भगिरथ शेटये यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाने आपल्या संकेतस्थळावर विद्यार्थी या पर्यायाखाली अभ्यास सामग्री नावाने दहावी व बारावीत विषयवार सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अपलोड केल्या आहेत.

पीडीएफ प्रकारातील या उत्तरपत्रिका डाऊनलोडही करता येतात. यावरून उत्तरे कशी लिहावीत हे विद्यार्थ्या्ंना समजू शकते. कोणत्याप्रकारे उत्तरपत्रिका लिहिल्याने पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात याची कल्पनाही विद्यार्थ्यांना येऊ शकते.

Web Title: Tenth students will immediately know their Internal Marks in Goa