दहशतवादास अर्थसहाय्य: काश्‍मीरमधील फुटीरतावादी अटकेत

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

शाह हा हुर्रियत नेते गिलानींचा जावई आहे; तर इस्लाम हा मवाळ हुर्रियत नेते मीरवाईझ उमर फारुख यांचा निकटवर्तीय आहे. अकबर हा गिलानींच्या हुर्रियतचा प्रवक्ता आहे. खान हादेखील हुर्रियतचाच सदस्य होता

श्रीनगर - काश्‍मीरमधील दहशतवादी संघटनांना अर्थसहाय्य केल्याच्या आरोपांतर्गत राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) आज (सोमवार) काश्‍मीर खोऱ्यामधील सात जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काश्‍मीरमधील मुख्य फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयाचाही समावेश आहे.

अल्ताफ शाह, अयाझ अकबर, पीर सैफुल्लाह, मेहराज कलवल, शाहिद उल इस्लाम, नईम खान आणि बिट्टा कराटे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शाह हा हुर्रियत नेते गिलानींचा जावई आहे; तर इस्लाम हा मवाळ हुर्रियत नेते मीरवाईझ उमर फारुख यांचा निकटवर्तीय आहे. अकबर हा गिलानींच्या हुर्रियतचा प्रवक्ता आहे. खान हादेखील हुर्रियतचाच सदस्य होता. काश्‍मीर खोऱ्यात अशांतता पसरविण्यासाठी पाकिस्तानकडून पैसे घेतल्याचे खान याने मान्य केल्याचे एका स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर खान याला निलंबित करण्यात आले आहे.

यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये जमात उद दावा या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हफीझ सईद याचा नामोल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय गिलानी व फारुख यांच्या नेतृत्वाखालील हुर्रियत, हिझबुल मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना व दुखतरन-इ-मिलात या संघटनांविरोधातही आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. शाह याच्या घरावर गेल्या महिन्यात एनआयएने धाड घातली होती. शाह हा फुटीरतावाद्यांमधील प्रभावी नेता मानला जातो.

काश्‍मीरमधील सध्याच्या अशांत परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर एनआयएकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

Web Title: Terror funding: NIA arrests seven separatist leaders