नोटाबंदीमुळे दहशतवाद, नक्षलवादाचा कणा मोडलाः मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

'माझ्यावर टीका करा. लोकांचे प्रश्न जरूर मांडा. तथापि, त्याचवेळी समाजाला सांगा, की त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही आणि ते मोबाईल बँकिंग वापरू शकतात,' असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) विरोधकांना दिला.

बानसकंठा (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. 'नोटाबंदीमुळे दहशतवाद आणि नक्षलवादाचा कणा मोडला,' असा दावा त्यांनी गुजरातमधील बानसकंठा येथील एका चीज फॅक्टरीच्या उद्घाटनप्रसंगी केला.

'मी दहशतवादाविरुद्ध लढतो आहे.  दहशतवादी कृत्यांना बनावट नोटांमध्ये पतपुरवठा होत होता आणि त्यातून दहशतवादाची आग भडकत होती,' असे पंतप्रधानांनी सांगितले. संसदेत नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी कामकाजात अडथळे आणले आहेत. त्याचा संदर्भ घेऊन मोदी म्हणाले, 'मला लोकसभेत बोलू दिले जात नाही.'

नोटाबंदीच्या फायद्यांचे वर्णन करताना ते म्हणाले, 'समाजाच्या तळागाळातील आणि प्रामाणिक लोकांना बळ देण्याचा नोटाबंदीचा उद्देश आहे. मी आधी वचन दिल्याप्रमाणे पन्नास दिवसांनंतर नोटाबंदीमुळे होणारा त्रास कमी होईल.' संसदेतील कामकाज बंद पाडण्याच्या प्रकारांवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलेल्या काळजीचा संदर्भ पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिला. 'केंद्र सरकार नोटाबंदीवर चर्चेला तयार आहे,' असा दावा त्यांनी केला.

'माझ्यावर टीका करा. लोकांचे प्रश्न जरूर मांडा. तथापि, त्याचवेळी समाजाला सांगा, की त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही आणि ते मोबाईल बँकिंग वापरू शकतात,' असा सल्ला मोदी यांनी विरोधकांना दिला. 'ज्यांनी काळा पैसा दडवला आहे, त्यांना नोटाबंदीनंतरच्या काळात सोडणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Terrorism destroyed because currency ban : Narendra Modi