खलिस्तानी दहशतवाद्यांना आयएसआयचे पाठबळ

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

आयएसआयच्या पाकिस्तानमधील प्रशिक्षण केंद्रामध्ये शिख तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात आहे. याचबरोबर युरोप, अमेरिका आणि कॅनडामधील शिख समुदायामध्येही भारतविरोधी विखारी प्रचार करण्यात येत आहे. या परिस्थितीवर केंद्रीय व राज्य सुरक्षा संस्थांचे लक्ष आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाईही करण्यात येत आहे

नवी दिल्ली - आयएसआय या पाकिस्तानच्या कुप्रसिद्ध गुप्तचर संस्थेकडून भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी शिख तरुणांना प्रशिक्षित केले जात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आज ( बुधवार) देण्यात आली.

इंटरनेट व सोशल मिडीयाच्या माध्यमामधून दहशतवादी संघटनांकडून मूलतत्त्वादाचा घातक प्रसार करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील अहवाल आज संसदेमध्ये मांडण्यात आला.

"आयएसआयच्या पाकिस्तानमधील प्रशिक्षण केंद्रामध्ये शिख तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात आहे. याचबरोबर युरोप, अमेरिका आणि कॅनडामधील शिख समुदायामध्येही भारतविरोधी विखारी प्रचार करण्यात येत आहे. या परिस्थितीवर केंद्रीय व राज्य सुरक्षा संस्थांचे लक्ष आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाईही करण्यात येत आहे,'' असे निरीक्षण या अहवालाच्या माध्यमामधून मांडण्यात आले आहे.

कॅनडा, युरोप व अमेरिकेमध्ये शिख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. या समुदायास भारताविरोधात भडकाविण्याचे प्रयत्न भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून अत्यंत आव्हानात्मक मानण्यात येत आहेत.

Web Title: terrorism isi pakistan india