काश्‍मिरात दहशतवाद्यांचा बँकांवर डोळा

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

काश्‍मीरमधील बँक लुटीच्या घटना 

  • पुलवामा : 4 
  • कुलगाम : 3 
  • अनंतनाग : 2 
  • शोपियॉं : 1 
  • किश्‍तवाड : 1

जम्मू : नोटाबंदीनंतर जम्मू आणि काश्‍मीरमधील दहशतवाद्यांनी चोरी करण्याचा पर्याय निवडला असून, मागील सहा महिन्यांत बँकांमधील तब्बल एक कोटी रुपयांवर दरोडा टाकला आहे. निष्पाप सामान्य नागरिक आणि सैनिकांचा जीव घेण्यापेक्षा दहशतवाद्यांनी काश्‍मीर खोऱ्यामध्ये बँकांची लूट करण्यास सुरवात केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी आज दिली. 

नोटाबंदीच्या दहशतवाद्यांना पैशाची चणचण भासू लागली असून, या दहशतवाद्यांनी बँका लुटण्यास सुरवात केली आहे. मागील सहा महिन्यांत बँक आणि एटीएममधून दहशतवाद्यांनी तब्बल एक कोटी रुपये लंपास केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी 'यूएनआय'ला दिली. काश्‍मीर खोऱ्यामध्ये बँका आणि एटीएमकडे दहशतवाद्यांनी आपला मोर्चा वळविला असून, सहा महिन्यांत अशा प्रकराच्या चोरीच्या 13 घटना समोर आल्या आहेत. दहशतवादी पहाटेच्या वेळी बँकांमधून मोठ्या रकमेची चोरी करत आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 

पैशाची चणचण जाणवत असल्यामुळे दहशतवादी बँका आणि एटीएम लुटून तो पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्‍मीर खोऱ्यात बँका लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. काश्‍मीर खोऱ्याबरोबरच जम्मू विभागातही चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. किश्‍तवाड येथील जम्मू आणि काश्‍मीर बँकेच्या शाखेतून 40 लाख रुपये लुटून नेण्यात आले. शस्त्रे खरेदी आणि इतर कामांसाठी पैशाचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे लष्करे तोयबा आणि हिज्बूलसारख्या दहशवादी संघटनांनी बँकांच्या दुर्गम भागातील शाखांकडे आपले लक्ष वळविले आहे. 

दुर्गम भागातील बँकांमधून मोठी रक्कम लांबविली जाते. त्यामुळे काश्‍मीरमधील बँकांच्या सुमारे दीड हजार शाखांना सुरक्षा पुरविण्याचे आव्हान सुरक्षा दलांसमोर निर्माण झाले आहे. बँकांमधून होणाऱ्या मोठ्या रकमेच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बँकांशी संबंधित एका राज्यस्तरीय समितीची शुक्रवारी श्रीनगरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पोलिस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी बँका आणि एटीएम केंद्राच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

    Web Title: Terrorist concentrating to rob the banks in Kashmir valley