दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आसामात तीन हुतात्मा

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

'आयईडी'च्या स्फोटात चार जवान गंभीर जखमी
गुवाहाटी - उल्फा (आय) आणि एनएससीएन (के) या दहशतवाद्यांच्या गटांनी आज आसाममध्ये लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा, तर चार जवान गंभीर जखमी झाले. आसाममधील तिनसुखिया जिल्ह्यातील पेंगेरी येथे ही घटना घडली.

'आयईडी'च्या स्फोटात चार जवान गंभीर जखमी
गुवाहाटी - उल्फा (आय) आणि एनएससीएन (के) या दहशतवाद्यांच्या गटांनी आज आसाममध्ये लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा, तर चार जवान गंभीर जखमी झाले. आसाममधील तिनसुखिया जिल्ह्यातील पेंगेरी येथे ही घटना घडली.

युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम आणि नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड (खापलांग गट) या संघटनांच्या 15 दहशतवाद्यांनी अत्याधुनिक स्फोटके (आयईडी), रॉकेट बॉंब (आरपीजी) आणि एके -47 या शस्त्रांच्या साह्याने आज सकाळी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. या वेळी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या "आयईडी' स्फोटांत एका जवानाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जवान जखमी झाले. "आयईडी'च्या स्फोटानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार केला. जखमींपैकी दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. लष्कराच्या जवानांनी तातडीने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले; मात्र सर्व दहशतवादी पळून गेले. जवानांच्या गोळीबारात दहशतवाद्यांची काही हानी झाल्याबद्दल अद्याप निश्‍चित माहिती मिळालेली नाही.

दहशतवाद्यांनी केलेल्या या शक्तिशाली स्फोटांत लष्कराची जीप आणि एक ट्रक ही वाहने बेचिराख झाली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या हल्ल्याबाबत आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत माहिती घेतली. सोनोवाल यांनी राजनाथसिंह यांना सर्व माहिती देत राज्य सरकारने सुरू केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. या हल्ल्याचा राजनाथसिंह यांनी निषेध केला असून, दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या तीन दिवसांत "उल्फा'ने केलेला हा दुसरा हल्ला आहे. 16 नोव्हेंबरलाही या संघटनेने चलनात आलेल्या नव्या नोटा घेऊन जाणाऱ्या एका गाडीवर केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

दहशतवाद्यांच्या स्फोटांत जवान हुतात्मा झाल्याने मला तीव्र दुःख झाले आहे. जखमींनी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना शोधून त्यांना शासन करू.
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

Web Title: Terrorists ambush in Assam, 1 soldier killed