शोधमोहीम थांबविण्यासाठी दहशतवाद्यांचा हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

दहशतवाद्यांचा शोध घेत जवान गावात दाखल होताच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाला. नंतर जखमी नागरिकाचा मृत्यू झाला.

श्रीनगर : दहशतवाद्यांपासून दक्षिण काश्‍मीरमुक्त करण्यासाठी सुरक्षा दलांनी गुरुवारी राबविलेली शोधमोहीम थांबविण्यासाठी दशहतवाद्यांनी लष्कराच्या एका गस्ती पथकावर हल्ला केला. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, तीन जवान जखमी झाले.

लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिस यांनी शोपियॉं जिल्ह्यात एकत्रितपणे राबविलेल्या शोधमोहिमेत सुमारे 4 हजार जवान सहभागी झाले असून, यासाठी दोन डझनांवर गावे रिकामी करण्यात आली आहेत. आज सकाळपासून राबविलेल्या या मोहीमेच्या 12 तासांनंतर सायंकाळी शोपियॉंच्या चौदरी गुंड आणि केल्लर भागात शोध घेणाऱ्या लष्करी जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. दहशतवाद्यांचा शोध घेत जवान गावात दाखल होताच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाला. नंतर जखमी नागरिकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी सुरक्षा दले शोधमोहिमेदरम्यान घराची आणि अन्य नागरी मालमत्तांचे नुकसान करत असल्याचा आरोप केला. पक्षाचे नेते अब्दुल कयूम शाह आणि मुश्‍ताक अहमद खांडे यांनी निवेदन जारी करत सर्वसामान्य निर्दोष लोकांचा छळ केला जात असल्याबद्दल निंदा केली आहे. सुरक्षा दले बळांचा वापर करत असल्याचा आरोप करत सैद अली गिलानी मिरवाईज उमर फारूक आणि मोहंमद यासिन मलिक या फुटीरतावाद्यांनीही एका संयुक्त निवदेनाद्वारे उद्या शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

Web Title: terrorists attack to stall search operation