या देशात निवडणूक आयोग आहे म्हणून बरे: सोनिया गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पटेल यांच्या विजयाबाबत भाजपला आक्षेप असल्यास ते न्यायालयात जाण्यासाठी मोकळे आहेत, असेही आझाद यांनी सुनावले आहे

नवी दिल्ली - गुजरातमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या राज्यसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे विजयी झाल्याबद्दल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे. सोनिया यांनी या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "देशात निवडणूक आयोग असल्याबद्दल' समाधान व्यक्त केले आहे.

कॉंग्रेसचे अन्य एक ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी हा विजय भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) एक धडा असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर पटेल यांच्या विजयाबाबत भाजपला आक्षेप असल्यास ते न्यायालयात जाण्यासाठी मोकळे आहेत, असेही आझाद यांनी सुनावले आहे. दरम्यान, या निवडणुकीतील दोन मते बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार अथवा नाही, याबाबत भाजपकडून अद्यापी कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्यसभेच्या गुजरातमधील तीन जागांसाठीच्या निवडणूक नाट्यावर तब्बल सहा तासांनी मध्यरात्री पडदा पडला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या. काँग्रेसच्या दोन आमदारांची मते अवैध ठरवल्याने काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा विजय सुकर झाला. 

Web Title: Thank God for Election Commssion, says Sonia Gandhi