
Kasturba Gandhi Death Anniversary : अन् नेहरुंनी पुण्यात सुरु केली भारताची पहिली अँटिबायोटिक्स कंपनी
Kasturba Gandhi Death Anniversary : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची आज पुण्यतिथी, कस्तुरबा गांधी यांचा जन्म ११ एप्रिल १८६९ मध्ये गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी झाला. कस्तुरबांचे लग्न जेव्हा गांधीजींशी झाला त्यावेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवलं. १८८८ साली जेव्हा गांधीजी पुढच्या शिक्षणासाठी लंडनला गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपनासाठी भारतातच राहिल्या. त्यांना मणिलाल, रामदास आणि देवदास ही आणखी तीन मुले होती.
पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये झाला मृत्यू
पुण्यातील आगा खान पॅलेस भारतातील स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्वाचे पान आहे. ८ ऑगस्ट १९४२ च्या मध्यरात्री मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भारत छोडो ठराव मंजूर करणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ऐतिहासिक अधिवेशन संपले. त्यानंतर लगेच, ९ ऑगस्ट रोजी, गांधी आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या इतर अनेक सदस्यांना भारताच्या संरक्षण नियमांनुसार अटक करण्यात आली.
गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा, सचिव महादेव देसाई, मीराबेन, प्यारेलाल नायर, सरोजिनी नायडू आणि डॉ. सुशीला नायर यांना आगाखान पॅलेसमध्ये आणण्यात आले, इथे एकप्रकारे त्यांना कैद करण्यात आले होते. ०६ मे १९४४ रोजी त्यांची सुटका होईपर्यंत गांधी आगा खान पॅलेसमध्ये राहिले. गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचे १८ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी दीर्घ आजारामुळे निधन झाले. इथे कस्तुरबांची समाधी सुद्धा आहे.
या कारणाने झालेला मृत्यू
कस्तुरबांना जन्मतःच क्रॉनिक ब्राँकायटिसचा त्रास होता. गांधीजी तुरुंगात असताना कस्तुरबांनी केलेल्या उपवसांमुळे जानेवारी 1१९०८ मध्ये त्यांची तब्येत आणखी खालावली. आगाखान पॅलेसमध्ये असतांना ब्रिटिश डॉक्टरांनी पेनिसिलीन लिहून दिली, ज्यामुळे त्या बऱ्या होऊ शकत होत्या पण गांधीजींनी परदेशी औषधाच्या इंजेक्शनला परवानगी देण्यास नकार दिला. त्यांना रात्री श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे शांत झोपही लागत नव्हती.
गांधींनी तेव्हाच्या सरकारकडे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी शिफारस केली बऱ्याच विलंबानंतर, सरकारने याला परवानगी दिली. कस्तुरबांची तब्येत सुरुवातीला बरी होत होती अगदी फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात त्या व्हरांड्यावर व्हीलचेअरवर बसून थोड्या वेळासाठी लोकांशी गप्पाही मारत होत्या, पण त्यांची तब्येत परत खालावली. अन् २२ फेब्रुवारी १९४४ रोजी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७:३५ वाजता आगा खान पॅलेसमध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
अन् सुरू झाली भारताची पहिली अँटिबायोटिक्स कंपनी (HAL)
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) ही कंपनी पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वदेशी औषधोपचार सुरु व्हावेत आणि भारतातील गरिबांना स्वस्त दरात औषधे मिळावीत या महात्मा गांधींच्या संकल्पनेच्या आधाराने पुण्यात निगडी येथे सुरु करण्यात आली.
WHO आणि UNICEF च्या सहकार्याने १० मार्च १९५४ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. याचे प्रॉडक्शन १९५५ मध्ये सुरु करण्यात आले.