...तर 'हा' होता राहुल गांधींचा 'प्लॅन-बी'

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

सिद्धरामय्या, गुलाम नबी आझाद आणि अशोक गहलोत हे काम करत आहेत, असे दाखविण्यात आले होते. मात्र, खरी जबाबदारी शिवकुमार यांच्यावर होती. तसेच गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची रणनीतीही आखण्यात आली होती.

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना बहुमतासाठी लागणारी 'मॅजिक फिगर' गाठता आली नाही. भाजपला फक्त 7 जागांची आवश्यकता होती. मात्र, कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्ता स्थापन करू द्यायचे नाही, हे काँग्रेसने ठरविले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन लोटस पार्ट-2' हाणून पाडण्याचे ठरले होते. मात्र, जर गरज पडल्यास राहुल गांधींकडून 'प्लॅन बी'चा वापर करण्यात येणार होता. 

siddaramaiah

राहुल गांधींनी मतदानानंतर आणि मतमोजणीपूर्वी गुलाम नबी आझाद, के. सी. वेणूगोपाल, अशोक गहलोत, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेतली होती. तसेच यासाठी त्यांनी 'प्लॅन बी'ही तयार केला होता. या प्लॅननुसार, सिद्धरामय्या यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली. जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास एच. डी. कुमारस्वामी यांना पाठिंबा देण्यासाठी सिद्धरामय्या यांना तयार करण्यात आले. इतकेच नाहीतर यासाठी राहुल गांधींनी सिद्धरामय्या यांची समजूतही काढली होती. तसेच वेळ आल्यास जेडीएसला पाठिंबा देऊन कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनविण्यात येईल, याबाबत राहुल गांधींनी सिद्धरामय्यांना सांगितले होते. या सर्वासाठी जेडीएससोबत संपर्क सुरु ठेवण्याची जबाबदारी डी. के. शिवकुमार यांच्यावर सोपविण्यात आली होती. याशिवाय मतमोजणीनंतर आमदारांकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. 

सिद्धरामय्या, गुलाम नबी आझाद आणि अशोक गहलोत हे काम करत आहेत, असे दाखविण्यात आले होते. मात्र, खरी जबाबदारी शिवकुमार यांच्यावर होती. तसेच गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची रणनीतीही आखण्यात आली होती. काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. कपिल सिब्बल जेडीएसकडून तर सिंघवी काँग्रेसकडून न्यायालयात जाण्याच्या तयारीत होते.

Web Title: then Rahul Gandhi used plan B for Karnataka Politics