पाकिस्तानात 69 बेकायदा दहशतवादी संघटना कार्यरत

पाकिस्तानात 69 बेकायदा दहशतवादी संघटना कार्यरत

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने काल "जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेवर काल बंदी घातली. मात्र, हा देश म्हणजे दहशतवाद्यांचं अक्षरशः नंदनवन झाला असून, बेकायदा ठरवलेल्या तब्बल 69 संघटना तेथे आहेत. त्यातील निम्म्याहून जास्त संघटना भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतल्या असल्याचे अधिकृत कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. 

पाकिस्तानच्या "नॅशनल काउंटर टेरोरिझम ऑथॉरिटी' (एनसीटीए) या संघटनेने 69 संघटनांवर दहशतवादी कारवायांबद्दल बंदी घातली असली, तरी "हिज्बुल मुजाहिदीन', "हर्कत उल मुजाहिदीन' आणि "अल बद्र' या संघटनांच्या कारवायांकडे पाकिस्तानने कायम काणाडोळा केला आहे. या तीनही संघटना जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवाया करतात.

मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार असलेला दहशतवादी हाफीज सईद याच्या नेतृत्वाखालील "जमात उद दावा' (जेयूडी) आणि या संघटनेसाठी निधी गोळा करणाऱ्या "फलाह ए इन्सानियत' या दोन संघटनांवर पाकिस्तानने काल बंदी घातली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 40 जवान हुतात्मा झाल्यावर जगभरातून आलेल्या दबावामुळे पाकिस्तानला ही कारवाई करावी लागली. "जेयूडी'च्या अखत्यारीत धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था, शाळा आणि रुग्णालये मिळून 300 संस्था येतात. त्याशिवाय एक प्रकाशनगृह त्यांच्या मालकीचे असून, रुग्णवाहिकांची सेवाही दिली जाते. या दोन्ही संस्थांचे मिळून 50 हजार सदस्य आहेत, शिवाय वेतनावर काम करणारे शेकडो कर्मचारीही त्यांच्याकडे आहेत.

"एनसीटीए'कडील माहितीनुसार, बेकायदा ठरविण्यात आलेल्या संघटनांपैकी बहुसंख्य संघटना बलुचिस्तान, गिलगिट- बाल्टिस्तान आणि "फेडरली ऍडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया'मध्ये (फाटा) कारवाया करतात. 

भारताच्या गृह मंत्रालयाकडील माहितीनुसार, पाकिस्तानने बंदी घातलेल्या 41 संघटनांपैकी निम्म्या संघटना पाकिस्तानात आहेत किंवा त्यांचे म्होरके तरी तेथे आहेत. या संघटनांना पाकिस्तानची फूस आहे. या संघटनांमध्ये "जैशे महंमद', "हिज्बुल मुजाहिदीन', "हर्कत उल मुजाहिदीन', "अल बद्र', "दुख्तरन ए मिल्लत', "बब्बर खालसा इण्टरनॅशनल', "खलिस्तान कमाण्डो फोर्स' आणि "इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन' आदींचा समावेश आहे. 

कारवाईचा फक्त दिखावा

"एनसीटीए'ने 2001 मध्ये "लष्करे जांगवी' या संघटनेवर बंदी घातली. ही संघटना पाकिस्तानातील असून, अफगाणिस्तानात तिच्या कारवाया चालतात. "तेहरिक ए तालिबान पाकिस्तान' (अफगाणिस्तान), बलुचिस्तान रिपब्लिकन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट, लष्करे बलुचिस्तान, बलुचिस्तान लिबरेशन युनायटेड फ्रंट, तंझिम नौजवाना ए अहले सुन्नत (गिलगिट) आदी संघटनांवरही बंदी घालण्यात आली आहे. कारवाईचा देखावा केला जात असला, तरी "जैशे महंमद'चा प्रमुख मसूद अजहर आणि "लष्करे तैयबा'चा प्रमुख हाफीज सईद पाकिस्तानात उघडपणे वावरत असल्याची वस्तुस्थिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com