अभियांत्रिकीसाठी सामायिक प्रवेश परीक्षा नाही

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रस्ताव बासनात

नवी दिल्ली : देशभरातील अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमांसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तूर्तास तरी बासनात गुंडाळून ठेवला आहे. सर्व राज्यांमध्ये मतैक्‍य होत नाही तोवर याबाबत निर्णय घेतला जाऊ नये, अशी भूमिका मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतली आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रस्ताव बासनात

नवी दिल्ली : देशभरातील अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमांसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तूर्तास तरी बासनात गुंडाळून ठेवला आहे. सर्व राज्यांमध्ये मतैक्‍य होत नाही तोवर याबाबत निर्णय घेतला जाऊ नये, अशी भूमिका मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतली आहे.

देशातील तांत्रिक शिक्षणाची नियामक संस्था असणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मार्चमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2018 पासून याची अंमलबजावणी केली जाणार होती. पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू यासारख्या राज्यांनी यास कडाडून विरोध केल्याने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यासाठी सर्वप्रथम राज्यांना विचारात घेण्याचा निर्णय घेतला होता. सामायिक प्रवेश परीक्षेबाबत सर्वांत मतैक्‍य असणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन संबंधित प्रवेश परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

"नीट'च्या धर्तीवर होणार होती परीक्षा
समान समुपदेशनाबाबतही अन्य राज्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. मागील वर्षी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेल्या "नीट'च्या धर्तीवर अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमांसाठी देखील सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले होते.

परीक्षेचे वेगळे रूप
"सीबीएसई' अभियांत्रिकी शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेते. यंदा अकरा लाखांपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. बरीच राज्ये यासाठी स्वतंत्र परीक्षा घेतात. काही महाविद्यालयांत गुणांचा विचार करून या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. काही खासगी महाविद्यालये स्वत:च्या प्रवेश परीक्षा घेतात.

तंत्रशिक्षणाचा व्याप
3,300
मान्यताप्राप्त
अभियांत्रिकी महाविद्यालये

16 लाख
दरवर्षी प्रवेश घेणारे विद्यार्थी

Web Title: There is no common entrance examination for engineering