फ्रान्स-भारतामध्ये गोपनीय करार नाही; राहुल गांधींचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

'फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मला सांगितले, की फ्रान्स-भारतामध्ये कोणताही गोपनीय करार नाही. तुम्ही ही गोष्ट संपूर्ण देशाला सांगू शकता', असा दावा राहुल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली : 'फ्रान्सशी भारताचा कुठलाही गोपनीय करार झालेला नाही. राफेल विमानांच्या करारासंदर्भात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाची दिशाभूल केली आहे', असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) केला. या आरोपावरून लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्‍वास ठराव मांडला आहे. त्यावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर विविध मुद्यांवरून टीकास्त्र सोडले. 

'फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मला सांगितले, की फ्रान्स-भारतामध्ये कोणताही गोपनीय करार नाही. तुम्ही ही गोष्ट संपूर्ण देशाला सांगू शकता', असा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे सीतारामन यांनी देशाची दिशाभूल केली असून त्या खोटे बोलल्या आहेत, असे राहुल म्हणाले. 

या विधानावरून सीतारामन संतप्त झाल्या. नियमानुसार, असा आरोप झाल्यास संबंधित सदस्याला तत्काळ उत्तर देता येऊ शकते. मात्र, काँग्रेसने यास विरोध केल्याने गदारोळ झाला. तहकुबीनंतर कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्वच सदस्यांना कानपिचक्‍या दिल्या.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is no confidential deal between India and France Rahul Gandhis claim