मुरगाव - 'त्यांना' बिल्डर, दुकानदार, व्यवसायिकांना लुटायचे होते : नगराध्यक्ष भावना नानोस्कर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

गोव्याचे नगरविकास मंत्री तथा मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्या गटातून भावना नानोस्कर यांची नगराध्यक्षपदासाठी निवड केली होती. गेले दोन महिने या पदावर कार्यरत राहून इमानेइतबारे सेवा बजविणाऱ्या सौ. नानोस्कर या गैर गोष्टी करण्यास मदत करीत नसल्याने त्यांचे सहकारी नगरसेवक बरेच नाराज झाले होते.

मुरगाव गोवा - वास्को येथील मुरगाव नगरपालिकेतील क्रितेश गांवकर, मुरारी बांदेकर आणि लिओ रॉड्रिग्ज या आपल्या गटातील तिघा नगरसेवकांना माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून बिल्डर, दुकानदार व अन्य व्यवसायिकांना लुटायचे होते. पण त्यांच्या या लूटमारीला आपली साथ मिळत नाही हे कळून आल्यावर त्यांनी माझ्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी पुढाकार घेतल्याचा खळबळजनक आरोप नगराध्यक्ष भावना नानोस्कर यांनी पत्रकारांकडे बोलताना केला. वास्कोचे ग्रामदैवत श्री देव दामोदरच्या वास्को सप्ताह काळात आपण नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या तोच दामबाब माझ्या पदाचे रक्षण करणार असा विश्वास सौ नानोस्कर यांनी व्यक्त करून कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही असा पवित्रा घेतला.

गोव्याचे नगरविकास मंत्री तथा मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्या गटातून भावना नानोस्कर यांची नगराध्यक्षपदासाठी निवड केली होती. गेले दोन महिने या पदावर कार्यरत राहून इमानेइतबारे सेवा बजविणाऱ्या सौ. नानोस्कर या गैर गोष्टी करण्यास मदत करीत नसल्याने त्यांचे सहकारी नगरसेवक बरेच नाराज झाले होते. त्याचे पडसाद सोमवारी (ता 8 आॅक्टोबर) झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत उमटले. नगराध्यक्षांच्याच गटातील क्रितेश गांवकर, मुरारी बांदेकर, लविना डिसोझा, दाजी साळकर, धनपाल स्वामी हे नगरसेवक तूटून पडले. त्यांनी राजीनाम्याची ही मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष भावना नानोस्कर या गैर व्यवहारांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप स्वकियांनी केला होता. तेव्हा वरील काही नगरसेवकच गैरकृत्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्यावर दबाव आणीत आहे, ते कोण नगरसेवक आहेत हे उघड करू का? असा दम आरोप करणा-या नगरसेवकांना भरल्यावर ते शांत झाले होते. तथापी, उद्या शुक्रवारी अविश्वास प्रस्ताव पारित होण्यापूर्वी नगराध्यक्ष भावना नानोस्कर यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेऊन क्रितेश गांवकर, मुरारी बांदेकर, आणि लिओ रॉड्रिग्ज हे नगरसेवक बिल्डर, दुकानदार आणि अन्य व्यवसायीकांना लूटण्याच्या तयारीत होते त्यासाठी ते गैर निर्णय घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणत होते. पण मी त्यांच्या दबावासमोर नतमस्तक न झाल्याने माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचे नगराध्यक्ष म्हणाल्या.

मुरगाव पालिकेत काही नगरसेवक लोकांची लूट करीत आहे. त्यात क्रितेश गांवकर, मुरारी बांदेकर आणि लिओ रॉड्रिग्ज हे आघाडीवर असल्याचे त्यांनी पत्रकारांकडे बोलताना सांगितले. दरम्यान, पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक पाश्कोल डिसोझा आणि सुसंस्कृत दाजी साळकर या लूटारुंना साथसंगत करीत असल्याबद्दल आपल्याला भरपूर दुःख झाल्याचे सौ नानोस्कर म्हणाल्या.

बायणा भागातील नगरसेवक मुरारी बांदेकर यांनी स्वातंत्रसैनीकाच्या नावावर असलेली दुकाने हस्तांतरण केलीच पाहिजे असा आग्रह आपल्याकडे धरला होता पण आपण त्याला दाद दिली नाही. मुरारी बांदेकर यांचे या प्रकरणी हितसंबंध गुंतलेले होते हे एकूण प्रकारांवरून स्पष्ठ झाले आहे असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आपण लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याकडे लक्ष केंद्रित केले. पण आपल्या गटातील वरील तिघा नगरसेवकांना जनतेची लूट करायची होती. त्यासाठी मला रबर स्टॅम्प प्रमाणे वापरायचा त्यांचा डाव होता पण मी तो यशस्वी होऊ दिला नाही म्हणून त्यांनी इतर नगरसेवकांना हाताशी धरून आपल्यावर अविश्वास ठराव मांडला आहे.

उद्या शुक्रवारी अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्यात मीच बाजी मारुन जाणार असा विश्वास सौ. नानोस्कर यांनी बोलून दाखविला.

Web Title: They want to cheat builders shopkeeper and industrialist says nagar president bhavna nanoskar