तिसऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा सुरू 

वृत्तसंस्था
रविवार, 8 जुलै 2018

दरड कोसळल्याने आणि खराब वातावरणामुळे बालतल मार्गावरची स्थगिती केलेली अमरनाथ यात्रा आज तिसऱ्या दिवशी सुरू झाली. तसेच पावसामुळे दोन दिवसांपासून स्थगित झालेली पेहलगाम मार्गावरची यात्रा कालपासून पूर्ववत सुरू झाली. 

श्रीनगर : दरड कोसळल्याने आणि खराब वातावरणामुळे बालतल मार्गावरची स्थगिती केलेली अमरनाथ यात्रा आज तिसऱ्या दिवशी सुरू झाली. तसेच पावसामुळे दोन दिवसांपासून स्थगित झालेली पेहलगाम मार्गावरची यात्रा कालपासून पूर्ववत सुरू झाली. 

पहेलगामच्या तळावरून सुमारे 2200 भाविकांचा आठवा जत्था रवाना झाला. भगवती नगर येथून 311 महिलांसह 2203 भाविक 51 वाहनांतून पहाटे पावणेतीनच्या सुमारास पहेलगामला रवाना झाले. तर दुसरीकडे बालतल मार्गावरून 1300 भाविकांचा जत्था शनिवारी पहाटे रवाना झाला. मात्र पुन्हा या मार्गावर भूस्खलन आणि दरड कोसळल्याने भाविकांना थांबविण्याचे निर्देश दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हवामानात सुधारणा झाल्यात भाविकांना पुढे जाण्यात परवानगी देण्यात येणार आहे. हा मार्ग सुरक्षित असून, काल रात्री दर्शन घेतलेले भाविक पुन्हा तळावर परतल्याची माहिती प्रशासनाने दिली. गेल्या चोवीस तासांत सुमारे 5 हजार भाविकांनी अमरनाथाचे दर्शन घेतले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. तसेच यात्रा तळावरील वाढती गर्दी लक्षात घेता गुरुवारपासून जम्मूच्या तळावरच भाविकांना थांबण्यास सांगितले गेले होते. निसरडे रस्ते आणि दरड कोसळत असल्याने 12 किलोमीटरच्या सर्वांत लहान बालतल मार्गावरच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना भगवतीनगर येथेच थांबविण्यात आले होते. खराब हवामानामुळे यात्रा स्थगित होत असल्याने जम्मूतील विविध केंद्रांत 20 हजार भाविक परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. भाविकांना आरोग्य, आहार आणि वीजपुरवठा सुरळित राहवा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे बहुतांश भाविक अन्य धार्मिक स्थळ जसे की वैष्णोदेवी आणि श्री शिव खोडी मंदिराचे दर्शन घेत आहेत.

Web Title: On the third day, Amarnath Yatra started