सिद्धू यांची दंडावर निभावले; रस्त्यावरील मारहाण व खूनप्रकरणी तुरुंगवास टळला

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

अत्यंत अवघड परिस्थितीवर मात करण्यासाठी देवाने मला नेहमीच मदत केली आहे. या कठीण काळात मला सतत पाठिंबा दिलेल्यांचा मी आभारी आहे. 
- नवज्योतसिंग सिद्धू, पंजाबचे मंत्री 

नवी दिल्ली, ता. 15 (पीटीआय) : रस्त्यावर मारहाण करून एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यांना केवळ मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवत खुनाच्या आरोपातून दोषमुक्त केले. 

न्या. जे. चेलमेश्‍वर आणि न्या. संजयकिशन कौल यांच्या खंडपीठाने पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने याप्रकरणी दिलेला निकाल फिरविला. उच्च न्यायालयाने सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपींदरसिंग संधू यांना तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. खंडपीठाने सिद्धू यांची खुनाच्या आरोपातून मुक्तता करत मारहाणप्रकरणी दोषी ठरवत एक हजार रुपये दंड ठोठावला. संधू यांना मात्र पूर्णपणे दोषमुक्त केले. या निकालामुळे सिद्धू यांचा तुरुंगवास टळल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

1988 मध्ये सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपींदरसिंग संधू यांनी गाडी रस्त्यातच उभी केल्यावरून त्यांचे आणि गुरनामसिंग या व्यक्तीचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान भांडणात होऊन सिद्धू यांनी गुरनाम यांना मारहाण केली आणि तेथून पसार झाले, असा पोलिसांचा दावा होता. गुरनाम यांना रुग्णालयात नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने 1999 मध्ये सिद्धू यांची खुनाच्या आरोपातून मुक्तता केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने 2006 मध्ये हा निकाल बदलत सिद्धू आणि संधू यांना दोषी ठरविले आणि तीन वर्षांचा तुरुंगवास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या निकालाविरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज निकाल लागला. 

अत्यंत अवघड परिस्थितीवर मात करण्यासाठी देवाने मला नेहमीच मदत केली आहे. या कठीण काळात मला सतत पाठिंबा दिलेल्यांचा मी आभारी आहे. 
- नवज्योतसिंग सिद्धू, पंजाबचे मंत्री 

Web Title: Thirty years on, final arguments in Navjot Singh Sidhu road rage case begin in SC