' 'भारत माता की जय' न म्हणणारे होतील इतिहासजमा'

पीटीआय
रविवार, 23 एप्रिल 2017

गुजरातपासून गोवाहटीपर्यंत, काश्‍मिरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम' अशा घोषणा म्हणायला हव्यात. जे कोणी त्यास विरोध करतील, ते इतिहासजमा होतील.

- दिलीप घोष
अध्यक्ष भारतीय जनता पक्ष, , पश्‍चिम बंगाल

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे पश्‍चिम बंगालमधील अध्यक्ष दिलीप घोष यांनी 'भारत माता की जय', 'जय श्री राम' म्हणण्यास जे विरोध करतील, ते इतिहासजमा होतील असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

परगना जिल्ह्यातील एका जाहीर सभेत घोष बोलत होते. ते म्हणाले, 'गुजरातपासून गुवाहटीपर्यंत, काश्‍मिरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम' अशा घोषणा म्हणायला हव्यात. जे कोणी त्यास विरोध करतील, ते इतिहासजमा होतील.' पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधत घोष म्हणाले, 'तुम्ही येथे तुमची शक्ती दाखवत आहात. तुम्ही पिळवणूक करत आहात. संपूर्ण देशात भारतीय जनता पक्ष असून पक्षाचे 11 कोटी सदस्य आहेत.'

घोष यांच्या वक्‍त्यावर तृणमूल काँग्रेसने टीका केली आहे. तृणमूलचे नेते पार्थ चटर्जी म्हणाले, 'त्यांना (भाजप) इतिहासाबद्दल काहीही माहिती नाही. धर्माचा गैरवापर करून लोकांना चिथावणी देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते भाजपच्या 11 कोटी सदस्यांबद्दल बोलत आहेत. मात्र देशात आणखी 110 कोटी लोकसंख्या असून ती भाजपचे स्वप्न साकार होऊ देणार नाही. त्यांनी लोकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला तरी लोक पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतच आहेत.' घोष यांच्याशिवाय भाजपचा अन्य कोणताही नेता अशा भाषेत बोलत नाही, असे सांगत चटर्जी यांनी घोष यांच्यावर निशाणा साधला.

Web Title: Those opposing Jai Sri Ram will be relegated to history: Dilip Ghosh