तोंडी तलाकप्रश्‍नी काही जणांचे मौन का?:योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

तोंडी तलाकविरुद्ध प्रत्येकाने भूमिका घेणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त करत आदित्यनाथ यांनी चंद्रशेखर हे सुद्धा समान नागरी कायद्याच्या बाजुनेच होते, असे स्पष्ट केले

नवी दिल्ली - "तोंडी तलाक'च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभावेळी आदित्यनाथ यांनी हे मत व्यक्त केले. तोंडी तलाकविरुद्ध प्रत्येकाने भूमिका घेणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त करत आदित्यनाथ यांनी चंद्रशेखर हे सुद्धा समान नागरी कायद्याच्या बाजुनेच होते, असे स्पष्ट केले. याचबरोबर, तोंडी तलाकच्या मुद्यासंदर्भात मौन पाळणारेही दोषीच असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

सर्वोच्च न्यायालयाकडून सध्या तोंडी तलाकच्या प्रथेची घटनात्मक वैधता तपासण्यात येत आहे. केंद्र सरकार व काही स्वयंसेवी संस्थांकडून तोंडी तलाकची ही प्रथा लैंगिक समानतेच्या विरोधात असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या भूमिकेस ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने व इतर काही महत्त्वपूर्ण मुस्लिम मौलवींनी ठाम विरोध दर्शविला आहे.

तोंडी तलाकला मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणची मान्यता असून; यामुळे हा विषय न्यायालयाच्या मर्यादेमध्ये येत नसल्याचे मुस्लिम बोर्डाने म्हटले आहे. याचबरोबर, तोंडी तलाक घटनात्मकदृष्टया अवैध ठरविणे म्हणजे कुराणचे पुनर्लेखन केल्यासारखे असल्याचा इशारावजा दावाही बोर्डाकडून करण्यात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर, तलाकसंदर्भात काही जणांनी पाळलेले मौन आश्‍चर्यकारक असल्याचे योगी आदित्यनाथ यांचे विधान राजकीयदृष्टया अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Those silent on triple talaq are also guilty', says Adityanath