लाखो कोटींचा काळा पैसा झाला खोटा!

पीटीआय
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - प्राप्ती जाहीर योजनेंतर्गत मुंबईतील एका कुटुंबाने उघड केलेला दोन लाख कोटी रुपयांचा काळा पैसा आणि अहमदाबादमधील व्यापाऱ्याचा 13 हजार 860 कोटी रुपयांचा काळा पैसा प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. खोटा दावा केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने त्यांची चौकशी सुरू केली आहे.

नवी दिल्ली - प्राप्ती जाहीर योजनेंतर्गत मुंबईतील एका कुटुंबाने उघड केलेला दोन लाख कोटी रुपयांचा काळा पैसा आणि अहमदाबादमधील व्यापाऱ्याचा 13 हजार 860 कोटी रुपयांचा काळा पैसा प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. खोटा दावा केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने त्यांची चौकशी सुरू केली आहे.

प्राप्ती जाहीर योजनेंतर्गत उघड झालेल्या काळ्या पैशांमधील दोघांच्या मोठ्या दाव्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला. छोटी प्राप्ती असणाऱ्या व्यक्तींनी हे दावे केल्यामुळे प्राप्तिकर विभागाने याची चौकशी सुरू केली. मुंबईतील अब्दुल रज्जाक मोहंमद सईद, त्यांचा मुलगा मोहंमद आरिफ अब्दुल रज्जाक सईद, पत्नी रुखसाना अब्दुल रज्जाक सईद आणि बहीण नूरजहॉं मोहंमद सईद (रा. फ्लॅट क्रमांक 4, ज्युबिली कोर्ट, 269 बी, टीपीएस-3, लिकिंग रोड, वांद्रे पश्‍चिम) या कुटुंबाने दोन लाख कोटी रुपयांचा काळा पैसा उघड केला होता. तसेच अहमदाबामधील महेश कुमार चंपकलाल शहा (रा. 206, मंगलज्योत टॉवर, जोधपूर ग्राम उपनगर) यांनी 13 हजार 860 कोटी रुपयांचा काळा पैसा उघड केला होता.

प्राप्तिकर विभागाने छाननी केल्यानंतर या काळ्या पैशाचे हे दोन्ही दावे रद्द केले. हे दावे करण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी सईद कुटुंबीय आणि शहा यांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. मुंबईतील सईद कुटुंबीयांपैकी तिघांची पॅन कार्ड अजमेर येथील आहेत. सप्टेंबर 2016 मध्ये या व्यक्ती मुंबईत आल्या. अजमेर येथेच हा काळा पैसा उघड करण्यात आला होता. अहमदाबादमधील शहा यांनी अनेक राजकारणी आणि उद्योगपतींची नावे उघड करण्याची धमकी दिली होती.

67 हजार 382 कोटी उघड
प्राप्ती जाहीर योजनेंतर्गत 65 हजार 250 कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाल्याचे सरकारने आधी जाहीर केले होते. आता सरकारने सुधारित आकडेवारीनुसार तो 67 हजार 382 कोटी रुपयांवर गेल्याचे म्हटले आहे. तसेच काळा पैसा उघड करणाऱ्यांची संख्या 71 हजार 726 आहे. यातून सरकारला आता 30 हजार कोटी रुपयांचा कर मिळणार आहे. यातून सईद कुटुंबीय आणि शहा यांनी जाहीर केलेला काळा पैसा वगळण्यात आल्याचे सरकारने नमूद केले आहे.

प्राप्ती जाहीर योजनेतील 65 हजार कोटी रुपयांच्या काळ्या पैशाला 13 हजार 860 कोटींचे छिद्र. अजून किती तरी छिद्रे असतील.
- पी. चिदंबरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री

Web Title: Thousands of crores of black money was a liar!