Cyclone Fani : 'फणी' बंगालच्या किनाऱ्यावर; ओडिशात मोदी करणार पाहणी

Cyclone Fani : 'फणी' बंगालच्या किनाऱ्यावर; ओडिशात मोदी करणार पाहणी

भुवनेश्वर/कोलकता : फणी चक्रिवादळाने आज (शनिवार) पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा दिला असून, कोलकता शहरात जोरदार पाऊस पडत आहे. कोलकतातील विमानसेवा काहीवेळ बंद ठेवण्यात आली होती, तर अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

फणी वादळाने ओडिशाला शुक्रवारी जोरदार तडाखा दिला. मुसळधार पाऊस आणि ताशी 175 ते 200 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ओडिशात मोठे नुकसान झाले असून, लाखो नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. 'फणी'च्या तडाख्यामुळे ओडिशात हाहा:कार निर्माण झाला असून, तीन जणांचे बळी गेले आहेत. ओडिशातील सुमारे 11 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (6 मे) ओडिशातील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. 

वेगाने वाहणारे वारे आणि जोरदार पावसामुळे वृक्ष कोसळून पडले असून, अनेक ठिकाणी घरे जमीनदोस्त झाली आहेत. पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. घरे पाण्याखाली गेली आहेत. घरांची छपरे उडून गेल्याने अनेक जण बेघर झाले आहेत. 

अतिशय गंभीर स्वरूप धारण केलेले फणी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांनी पुरी शहराला तडाखा दिला. 'फणी'मुळे पुरी, नयाघर आणि केंद्रापाडा जिल्ह्यांत तीन जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आपत्ती निवारण विभागाचे विशेष आयुक्त बी. पी. सेठी यांनी दिली. पुरीत वृक्ष आंगावर कोसळल्यामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झाला. तर नयाघरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला.

फणी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर पोचण्यापूर्वीच तातडीने उपाययोजना करण्यात आल्यामुळे बळींची संख्या वाढलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून ओडिशातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे.

प्रशासनाने दोन दिवसांत दहा हजार गावे आणि 52 शहरी भागांमधून सुमारे 11 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. राज्यात चार हजार निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. चक्रीवादळात तग धरू शकतील, अशी 800 विशेष निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. ओडिशातील खोर्दा, कटक, जाजपूर, भद्राक, बालासोर मार्गे फणी चक्रीवादळाने पश्‍चिम बंगालमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तेथेही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com