मोटारीच्या धडकेत बेळगावचे तिघे तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

बेळगावहुन खानापूर कडे निघालेल्या इंडिका मोटारीची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकी वरील तिघेजण रस्त्यावर उडून पडल्याने त्यांच्या डोकीला गंभीर इजा झाली. यामध्ये ते जागीच ठार झाले.

बेळगाव - सुटीचा दिवस असल्याने फिरायला गेलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या मोटारीची जोरदार धडक बसून तिघे तरुण जागीच ठार झाले. खानापूर रोडवरील प्रभु नगर जवळ आज सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. तिघेही तरुण 20 वर्षाचे असून एकजण कोनवाळ गल्ली व दोघे वडगाव परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की शहरातील जैन महाविद्यालयात शिकणारे अथर्व, हर्ष व ऋतिक हे तिघेजण आज सकाळी एक्टिवा दुचाकीवरून गणेबैल जवळील भूतनाथ डोंगरावर गेले होते. तिकडून अकराच्या सुमारास ते बेळगावला परतत होते. प्रभु नगर जवळील उतारीला दुचाकी आली असता त्यांच्या समोरून दुसरे वाहन चालले होते. त्याला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना बेळगावहुन खानापूर कडे निघालेल्या इंडिका मोटारीची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकी वरील तिघेजण रस्त्यावर उडून पडल्याने त्यांच्या डोकीला गंभीर इजा झाली. यामध्ये ते जागीच ठार झाले. मोटारीमधील सर्वजण खानापूर कडे मुलगी पाहायला जात असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल शिरसंगी व अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या तरुणांची पूर्ण नावे समजली नसली अद्याप समजले नसून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तिन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागरात हलविण्यात आले आहेत. रीतसर नोंद घेतल्यानंतरच शवविच्छेदन होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Three people killed in Belgaum accident by motorbike