श्रीनगरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार 

पीटीआय
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

श्रीनगर : श्रीनगरच्या फतेह कडल भागात सीआरपीएफचे जवान दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तय्यबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. या घटनेनंतर खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगरमधील शाळा सोडून देण्यात आल्या आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. 

श्रीनगर : श्रीनगरच्या फतेह कडल भागात सीआरपीएफचे जवान दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तय्यबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. या घटनेनंतर खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगरमधील शाळा सोडून देण्यात आल्या आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. 

कडल भागात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीआरपीएफच्या जवानांच्या मदतीने फतेह कडल भागात पहाटेच्या वेळी संशयित घराजवळ शोधमोहीम सुरू केली. घरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार करून दहशतवाद्यांना जेरीस आणले. तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच रस्त्यावर तिघे मारले गेले. मृत दहशतवाद्यांची ओळख पटली असून मेहराजुद्दीन बांगरू, फहद वझा आणि रईस अहमद अशी त्या तिघांची नावे होत. बांगरू हा लष्कर ए तय्यबाचा टॉप कमांडर मानला जात होता, तर रईस हा दहशतवाद्यांना मदत करण्याचे काम करत होता.

रईसच्या घरातच हे तिघे होते. प्रचंड प्रमाणात गोळीबार झाल्याने घराची नासधूस झाली आहे. चकमकीतील हुतात्मा कॉन्स्टेबलचे नाव कोमल सिंह असे असून, ते रियासी जिल्ह्यातील रहिवासी होत. खबरदारीचे उपाय म्हणून शहरातील सर्व शाळा सोडून देण्यात आल्या आणि मोबाईल सेवाही स्थगित करण्यात आली आहे. दहशतवादी बंगारू हा फतेह कडाल भागातील रहिवासी होता, तर दुसरा दहशतवादी खानयार भागात राहत होता. 

दरम्यान, फुटिरतावादी नेते सय्यद अली गिलानी, मिरवाईज उमर फारुख आणि मोहंमद यासिन मालिक यांनी घरमालकाचा मुलगा रईस अहमद, मेहराजुद्दीन बंगारू आणि फैद फहद वझा यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला. तसेच, फतेह काडाल भागातील चकमकीचे वार्तांकन करण्यापासून पत्रकारांना रोखल्याबाबत काश्‍मीर प्रेस क्‍लबने नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचेही काही पत्रकारांनी सांगितले. 

श्रीनगरमधील अनेक हत्याकांडांत बंगारूचा हात होता. शहर आणि लष्कर- ए- तय्यबाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून त्याकडे पाहिले जात होते. बंगारूला ठार करून जवानांनी मोठे यश मिळवल्याचे पोलिस महासंचालक स्वयम प्रकाश पनी यांनी म्हटले आहे. या चकमकीनंतर जुन्या शहरात हिंसाचार उसळला. जवानांच्या दिशेने युवकांनी दगडफेक केली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

पोलिसांवर ग्रेनेड हल्ला 

बारामुल्ला जिल्ह्यात ग्रेनेड हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. पट्टण भागात आज दुपारी झालेल्या हल्ल्यात पोलिस उपअधीक्षक जखमी झाले. जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Three terrorists killed in Srinagar encounter